Wed, Jul 08, 2020 16:54होमपेज › Marathwada › युतीकडून आ. मुंदडा, हेमंत पाटलांत चुरस

युतीकडून आ. मुंदडा, हेमंत पाटलांत चुरस

Published On: Mar 18 2019 1:31AM | Last Updated: Mar 17 2019 9:01PM
गजानन लोंढे, हिंगोली

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. अद्यापही शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला नसल्याने युतीचा उमेदवार कोण, हाच प्रश्‍न सध्या मतदारसंघात चर्चेत आहे. शिवसेनेकडून वसमतचे आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा व नांदेडचे आ. हेमंत पाटील यांच्यामध्ये उमेदवारीबाबत चुरस आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र एकमेव विद्यमान खा. राजीव सातव यांचेच नाव सध्यातरी चर्चेत आहे. वंचित बहुजन आघाडीने मात्र मोहन राठोड यांना उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या मोठी आहे. त्या खालोखाल ओबीसी व बंजारा तसेच इतर समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. 2014 च्या निवडणुकीत खा. राजीव सातव यांनी मोदी लाटेतही शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर वानखेडे हे भाजपमध्ये गेल्याने शिवसेनेसाठी खा. सातव यांना टक्कर देणार्‍या उमेदवाराचा शोध सुरू आहे. सुरुवातीला वसमतचे आ. जयप्रकाश मुंदडा, माजी आ. प्रकाश पाटील-देवसरकर, डॉ. बी. डी. चव्हाण यांच्या नावांची चर्चा होती. परंतु, भाजप-सेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. आ. हेमंत पाटील, नागेश पाटील-आष्टीकर यांच्याबरोबरच रूपालीताई पाटील गोरेगावकर, रामेश्‍वर शिंदे, प्राचार्य पंडितराव शिंदे यांनीही निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली असली, तरी खरी चुरस आ. जयप्रकाश मुंदडा व आ. हेमंत पाटील यांच्यामध्ये दिसून येत आहे. काँग्रेसकडून विद्यमान खा. राजीव सातव यांचे एकमेव नाव चर्चेत असले, तरी काँग्रेसने जाहीर केलेल्या दोन्ही याद्यांमध्ये खा. सातव यांच्या नावाचा समावेश नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. मध्यंतरी कळमनुरीचे आ. डॉ. संतोष टारफे यांच्याही नावाची चर्चा सुरू होती. परंतु, खा. सातव यांचे पक्षपातळीवरील वजन लक्षात घेता, तेच उमेदवार असतील यात शंका नाही. 

वंचित बहुजन आघाडीकडून दोन दिवसांपूर्वीच सेवानिवृत्त अधिकारी मोहन राठोड यांच्या नावाची अधिकृृत घोषणा करण्यात आली आहे. राठोड हे बंजारा समाजातील असल्यामुळे त्यांची उमेदवारी काँग्रेससाठी धोक्याची ठरणार आहे. बंजारा मतदारांबरोबरच दलित व मुस्लिम मतांचा त्यांना आधार मिळणार असल्याने राठोड यांना नेमकी किती मते मिळतात, यावर काँगे्रस आघाडीच्या उमेदवाराचे भवितव्य आहे. सध्या तरी केवळ वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. काँगे्रस व शिवसेनेच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा झाली नसल्याने आघाडी व युतीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

विद्यमान खा. राजीव सातव यांची पक्ष पातळीवर राहुल गांधी यांच्या जवळचे म्हणून ओळख आहे. त्यांच्याकडे सध्या गुजरात राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी आहे. युवा नेतृत्व म्हणून खा. सातव यांच्याकडे पाहिले जाते. विकासाच्या दृष्टिकोनाबरोबरच उभरते ओबीसी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. मागील चार वर्षांत त्यांनी मतदारसंघात संपर्क कायम ठेवत शेतकरी, कष्टकरी समाजाच्या प्रश्‍नांसाठी मोठी आंदोलने उभारली. याबरोबरच पक्षामध्ये वाढलेल्या गटबाजीचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे. हिंगोली विधानसभेचे माजी आ. भाऊराव पाटील-गोरेगावकर यांच्यासोबत त्यांचे वितुष्ट अडचणीचे ठरणार आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातही प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व खा. राजीव सातव या दोघांचे वेगळे गट आहेत. राष्ट्रवादीशी जुळवून घेत, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व पदाधिकार्‍यांना प्रचारात सहभागी करून घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

शिवसेनेकडून आ. जयप्रकाश मुंदडा, आ. हेेमंत पाटील या दोघांमध्ये उमेदवारीबाबत चुरस आहे. आ. मुंदडा हे अल्पसंख्याक समाजातून आले आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभा मतदारसंघात केवळ निष्ठावंतांच्या भरवशावर निवडणूक लढवावी लागणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आ. मुंदडा यांनी काँग्रेसपूरक घेतलेली भूमिका त्यांना यंदाच्या निवडणुकीत अडचणीची ठरणार आहे. दुसरीकडे आ. हेमंत पाटील नांदेडचे नेतृत्व करतात. त्यांना स्थानिक शिवसैनिकांचा विरोध आहे. शिवसेनेकडून मराठा नेतृत्वास उमेदवारी देण्यासंदर्भात चाचपणी केली जात असल्याने ऐनवेळी तेच शिवसेनेचे उमेदवार राहतील, अशी चर्चा आहे. विद्यमान खा. राजीव सातव यांना टक्कर देण्यासाठी हेमंत पाटील हेच योग्य उमेदवार असल्याचे पक्षश्रेष्ठींना काही पदाधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे.