Mon, Jul 13, 2020 23:19होमपेज › Marathwada › दोन सावत्र भावांकडून कोयत्‍याने वार करून भावाचा खून

सावत्र भावांकडून कोयत्‍याने वार करून भावाचा खून

Published On: Apr 04 2019 11:47AM | Last Updated: Apr 04 2019 3:09PM
परभणी : प्रतिनिधी  

कोयत्याने वार करुन घाटी व्यावसायीकांचा खून केल्याची घटना गुरुवारी (दि.4) सकाळी 9.30 वाजण्याच्या  सुमारास घडली. परभणी शहरातील गुजरी बाजार परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच नानलेपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनाम केला. खून झालेल्या व्यक्‍तीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 

सोमनाथ लक्ष्मण आळणे (रा.भोई गल्ली,परभणी) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. सोमनाथचे दोन सावत्रभाऊ सचिन आळणे, नितीन आळणे (रा.भोई गल्ली,परभणी) असे आरोपींची नावे आहेत. व्यवसायाने घाटी विक्रेते असलेल्या या भावांमध्ये गुजरीबारात गाडा लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातूनच गुरुवारी सकाळी या दोन्ही भावांनी मिळून  गुजरी बाजार येथेच सोमनाथ आळणे यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांचा खून केला.

घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे, सहायक पोलिस निरीक्षक गिरी यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान परिसरात नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी सोमनाथचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.