होमपेज › Marathwada › ...तर, 'आम्‍ही २५० पेक्षा अधिक जागा जिंकू; पुढील मुख्यमंत्री फडणवीसचं' (video)

...तर, 'आम्‍ही २५० पेक्षा अधिक जागा जिंकू; पुढील मुख्यमंत्री फडणवीसचं' (video)

Published On: Aug 01 2019 12:43PM | Last Updated: Aug 01 2019 6:21PM
मराठवाडा : प्रतिनिधी

काही लोकांच्या मते आंम्‍हाला यावेळी २०० पेक्षा अधिक जागा जिंकाव्या लागतील, मात्र मला वाटते की, भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढविल्‍यास आपण २५० पेक्षा अधिक जागा जिंकू आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी आशा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्‍त केली. भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून आज (ता.१) यात्रेस प्रारंभ होत आहे. यावेळी जाहीर सभेत ते बोलत होते. 

भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून आज (ता.१) यात्रेस प्रारंभ झाला.. मागील पंधरा वर्षात झाली नाही, त्याच्या दुप्पट कामे पाच वर्षात आमच्या सरकारने केली असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आज केला. मोझरी येथे जनादेश यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्तविक राज्याचे कृषीमंत्री डॅा.अनिल बोंडे यांनी केले. वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षे पदाचा कालावधी पूर्ण करणारे देवेंद्र फडणविस हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. विदर्भाचा अनुशेष आणि अन्य विकासाचे प्रश्न त्यांनी सोडविले. ख-या अर्थाने न्यायाचे सरकार चालविण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली आसल्याचे बोंडे म्हणाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात फडणविस यांनी गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राचा कायापालट केला आसे स्पष्ट केले. पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नेतृत्व करावायाचे असल्याने जनतेला काय हवे काय नको हे विचारण्यासाठी यात्रा काढली आहे. पुढील पाच वर्षात समाज सुखी आणि आनंदी राहण्याठी आमचा प्रयत्न आहे. दिर्घकाळ रेंगाळलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविला. ओबीसीच्या सवलतीना हाथ न लावता त्यांनी आरक्षणाची समस्या सोडविली असे पाटील म्हणाले. याचबरोबर अबकी बार 220 पार अशी घोषणा त्यांनी केली.

राज्यभरात १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान भाजपची महाजनादेश यात्रा निघत आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. या यात्रेत मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देणार आहेत. तसेच मतदारांना सरकारने राबवलेल्या योजनांची माहितीही देणार आहेत. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही करण्यासाठी भाजप आता पासूनच तयारीत असल्याचे चित्र आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही महाजनादेश यात्रा निघणार आहे.