Sat, Jul 11, 2020 21:29होमपेज › Marathwada › अंबाजोगाईत पावसाच्या आगमनाने तात्पुरती चिंता दूर (Video)

अंबाजोगाईत पावसाच्या आगमनाने तात्पुरती चिंता दूर (Video)

Published On: Sep 04 2019 8:51AM | Last Updated: Sep 04 2019 8:53AM
अंबाजोगाई : प्रतिनिधी 

अंबाजोगाई शहर आणि तालुक्यात सोमवारी आणि मंगळवारी सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने शेतक-यांची आणि नागरिकांची चिंता तात्पुरती दूर झाली आहे. पावसाने जोर धरला असून आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मोठा पाऊस झाल्याशिवाय विहीरी, बोअरची पाणी पातळी वाढणार नाही. त्याचप्रमाणे मांजरा धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणेही गरजेचे आहे. 

अंबेजोगाई भागात २ महिन्यापासूनची पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. पाऊसच पडत नसल्याने जीव टांगणीला लागला होता. दुष्काळाचे ढग दाट झाले होते. शेतक-यांसह सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पाऊस पडतो की नाही? हीच चर्चा सर्वत्र होती. अखेरीस दोन दिवसांपासून अंबाजोगाई व परिसरात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा जीव भांड्चात पडला आहे. बहुतांश शिवारातील पिकांनी मान टाकली आहे. पाऊस वेळेवर पडला नसल्याने उत्पन्नात मोठी घट येणार हे निश्चित आहे. परंतु आता सुरु झालेला पाऊस असाच पडत राहिल्यास पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चा-याचा प्रश्न मिटन्यास मदत होणार आहे.

पाऊस सुरू झाल्याच्या आनंदात अनेकांनी एकमेकांना फोनवरून माहिती देत व्यक्त केला. खुशीत चहापाण्याचेही आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यानंतर पावसात भिजण्याचा आनंद लुटला.