होमपेज › Marathwada › राष्ट्रवादी पुन्हा अडचणीत, जगदाळेंना अपात्र ठरविण्याबाबत तक्रार 

राष्ट्रवादी पुन्हा अडचणीत, जगदाळेंना अपात्र ठरविण्याबाबत तक्रार 

Published On: May 16 2018 8:37PM | Last Updated: May 16 2018 8:38PMबीडः प्रतिनिधी

नामनिर्देशन पत्रात खोटी माहिती देवून शासनाचे लाभार्थी असल्याचे लपवल्या प्रकरणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे उमेदवार अशोक जगदाळे यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, अशी तक्रार सुधीर पाटील यांनी बुधवारी ( दि.16 ) उस्मानाबाद निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. प्रशासनाने तक्रार दाखल करून घेतली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने पक्षाने अपक्ष उमेदवार जगदाळे यांनाच पुरस्कृत केले होते. सदर तक्रार दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. 

बीड - लातूर - उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी दि. 21 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेले उमेदवार अशोक जगदाळे यांच्या विरोधात उस्मानाबाद येथील सुधीर केशवराव पाटील यांनी बुधवारी ( दि.16 ) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, 2005 मध्ये जगदाळे यांनी आपली कंपनी दृष्टी रिअलेटर्स याद्वारे शासकीय म्हाडा यांच्या बरोबर करारनामा करून वांद्रे रिक्लेमेशन येथे असलेल्या म्हाडा बिल्डींगच्या शासकीय जागेवर शासनाबरोबर करारनामा करून ते एका रेस्टॉरंटला भाड्याने दिलेले आहे. ज्यामुळे म्हाडा बरोबर केलेल्या कारारनाम्याचे  उल्लंघन झाले आहे. 

सदर रेस्टॉरंट बिअरबार असून त्याठिकाणी दारू विक्रीही केली जाते. त्यामुळे बॉम्बे आर्ट सोसायटी यांना मोठा त्रास होत आहे. म्हणून सोसायटीचे सचिव चंद्रजित यादव यांनी अशोक जगदाळे यांच्यासह रेस्टॉरंटच्या  त्रासाला कंटाळून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने हे प्रकरण तडजोडीसाठी लवादाकडे पाठवलेले आहे. अशोक जगदाळे हे शासनाच्या म्हाडाचे लाभार्थी असूनही त्यांनी लोकप्रतिनिधी अधिनियमाचा भंग केलेला आहे. 

अशोक जगदाळे यांचे शासकीय जमिनीवर 30 वर्षांकरिता करारनामा करून उपभोग घेणे हे कायद्याच्या तरतुदीनुसार असून ते शासनाचे लाभार्थी आहेत. म्हणून त्यांनी घटनेतील तरतुदीचा भंग केला आहे. यावरून त्यांनी नामनिर्देशन पत्रात सत्य माहिती न पुरविता अर्धवट माहिती देवून निवडणूक निर्णय अधिकार्‍याची तसेच आपली फसवणूक केल्याचे नमूद केले आहे. 

त्यामुळे अशोक जगदाळे यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवून त्यांच्यावर बंदी टाकावी अशी मागणी सुधीर पाटील यांनी तक्रारीन्वये केली आहे. सुनावणीच्यावेळी सर्व पुरावे सादर करणार असल्याचे पाटील यांनी अर्जात म्हटले आहे. दरम्यान अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवार जगदाळे यांना पुरस्कृत करण्याची वेळ आली होती. आता जगदाळे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पुढील अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. याप्रकरणात निवडणूक अधिकारी काय निर्णय देतात याकडे तिन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

Tags : ashok jagadale, Complaint, disqualifying, ncp, Trouble