Tue, Jul 07, 2020 06:06होमपेज › Marathwada › बीड : अडीच महिन्यांनंतर उघडली दारू दुकाने, सकाळपासूनच रांगा  

बीड : अडीच महिन्यांनंतर उघडली दारू दुकाने, सकाळपासूनच रांगा  

Last Updated: May 26 2020 3:33PM
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिस प्रशासनाचा दुकानांवर वॉच

अंबाजोगाई (बीड) : प्रतिनिधी 

अडीच-पावणेतीन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानंतर दि. २६ पासून जिल्ह्यातील वाईन शॉप, देशी दारू दुकाने, आणि बिअर बार उघडण्यात आलेली आहेत. त्यामुळे दारू शौकीनांची प्रतीक्षा संपली आहे. अनेकांनी एकमेकांना चिअर्स करून आनंद व्यक्त केला आहे. 

दारू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सकाळपासूनच दारूच्या दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. दरम्यान, गर्दी आटोक्यात आणण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिस प्रशासनाने दुकानांवर वॉच ठेवला आहे. दारू खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेक ग्राहकांनी मास्क वापरण्याच्या नावाखाली आपला चेहरा दिसणार नाही, याचीही खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळाले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २५ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी आणि लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. दीर्घ कालावधीनंतर जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीत अकरा तासांची ढील दिली असून बहुतांश दारू, बिअर बारसह बहुतांश व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. अंबाजोगाई विभागातील देशी दारु दुकाने ३८, वाईन मार्ट ०४, बिअर शॉप ५४, परमिट रूम १२२ अशी एकूण २१८ नोंदणीकृत दुकाने सुरू झाले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक ए. एम. पठाण यांनी दिली.

अडीच ते पावणेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप्स, देशी दारू दुकाने व बिअर बार बंद ठेवण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही सर्व दुकाने व गोडाऊन सील केली होती. त्यामुळे अनेक दारू शौकिनांची आणि विक्रेत्यांची मोठी पंचाईत झाली होती. दारू विक्रीस बंदी असल्याचा फायदाही अनेक जणांनी घेतल्याचे समोर आले आहे. अनेकांनी छुप्या मार्गाने दारूची विक्री करून उखळ पांढरे करून घेतल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, दि. २६ मेपासून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दारू विक्रीस परवानगी दिल्या कारणाने सकाळपासूनच ग्राहकांनी दारूच्या दुकानासमोर गर्दी केली होती. बहुतांश जणांनी ऑनलाईन खरेदी करणे पसंत केले आहे. दुकानदारांनी तशी डिलिव्हरी बॉयची सोय केली आहे.