Mon, Jul 06, 2020 21:50होमपेज › Marathwada › परभणीत दोन वसतिगृहांवर कारवाई अटळ

परभणीत दोन वसतिगृहांवर कारवाई अटळ

Published On: Mar 22 2018 1:56AM | Last Updated: Mar 22 2018 1:52AMपरभणी : नरहरी चौधरी

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत कार्यरत असणार्‍या परभणी शहरातील दोन वसतिगृहांमध्ये शासन नियमाला तिलांजली दिली जात असल्याची बाब सीईओ पृथ्वीराज यांच्या तपासणीत उघड झाली. या वसतिगृहांना नोटीसा देण्यात आल्या असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाचे आयुक्‍त यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे या दोन्ही वसतिगृहांवर होणार्‍या कारवाईने बोगस वसतीगृह चालकांवर मोठा वचक बसणार आहे. 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पुर्ण करता यावा, ग्रामीण भागात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे, आर्थिक दुरावस्थेमुळे पालकांना मुलांच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत व विद्यार्थ्यांचा शैक्षणीक विकास व्हावा या उद्देशाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत एकूण 63 वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये तब्बल 3 हजार 40 विद्यार्थी शासनाच्या माहितीत कळवले आहेत. यातच त्यांचे निवास, भोजनाची विनामुल्य सोय केली जाते. यासाठी शासनामार्फत स्वयंसेवी संस्थांना प्रति विद्यार्थी 900 रूपयांप्रमाणे अनुदाने दिले जाते.

तसेच अधीक्षकांना  8 हजार , स्वयंपाकींना 6 हजार, मदतनीस 5 हजार, पहारेकरी यांना  5 हजार रूपये असे प्रतिमाह मानधन अदा केले जाते. याबरोबरच इमारत भाड्याापोटी , सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या भाड्याच्या 75 टक्के अनुदान संस्थेस देण्यात येते.या वसतिगृहांवर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत नजर ठेवली जाते. प्रत्येक वर्षाअखेर अधिकारी व कर्मचारी तपासणी करतात. पण त्यांना आतापर्यंत एकही बोगस वसतिगृह असल्याचे तपासणीत आढळले नव्हते.

पहिल्यांदाच नूतन सीईओ बी.पी.पृथ्वीराज यांनी 18 मार्च रोजी परभणी शहरातील लहुजी नगरात असणार्‍या बालगंगाधर लोकमान्य टिळक वसतिगृह व आदर्श मुलींचे वसतिगृह यांची अचानक भेट देवून पाहणी केली. यावेळी वसतिगृहातील सावळागोंधळ उघड झाला. यात शासनाच्या माहितीत टिळक वसतिगृहात 42 तर मुलींच्या वसतिगृहात 54 विद्यार्थी दाखवले आहेत. पण यावेळी विद्यार्थी संख्या प्रत्यक्षात कमी आढळली. तसेच निकषाप्रमाणे कुठल्याही सुविधा नसल्याचे उघड झाले. यामुळे सदरील वसतिगृहांना नोटीसा बजावल्या असून त्यांचा परवाना रद्द करून योग्य ती कारवाई करण्याबाबत आयुक्‍तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती सीईओ पृथ्वीराज यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

Tags : marathwada parbhani news, action,taken, two hostales