Tue, Jul 14, 2020 02:59होमपेज › Marathwada › पाण्यासाठी विहिरीत उतरलेल्या चिमुरडीने गमावला जीव! 

पाण्यासाठी विहिरीत उतरलेल्या चिमुरडीने गमावला जीव! 

Published On: May 28 2019 5:05PM | Last Updated: May 28 2019 5:05PM
परळी वैजनाथ : प्रतिनिधी

सर्वत्र भीषण दुष्काळाची धग होरपळून काढते आहे. पाण्याअभावी जनावरेच काय माणसांनाही वणवण भटकायची परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगानेच पाणी पिण्यासाठी विहीरीत उतरलेल्या एका चिमुरडीने आपला जीव गमावल्याची घटना परळी तालुक्यातील मैंदवाडी येथे घडली आहे. 

परळी तालुक्यातील मैंदवाडी रुपसिंग तांडा येथील एका मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पाणी टंचाईने हैराण असलेल्या मैंदवाडीच्या रुपसिंग तांडा येथील कु. कामका संतोष राठोड (वय 12 वर्षे) ही मुलगी जनावरे चारत असताना दुपारच्यावेळी तहान लागली म्हणून नेहमीप्रमाणे शिवारातील एका विहिरीवर गेली.  पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरताना पाय घसरुन विहीरीत पडली. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सोबत असलेल्या मुलाने तांड्याकडे धाव घेऊन आरडाओरडा केला तेव्हा ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कॉ. रामचंद्र केकाण हे करत आहेत.