पाटोदा : महेश बेदरे
1954 पासून हजारो विद्यार्थी घडविणारी जिल्हा परिषद हायस्कुलची इमारत आता शेवटची घटका मोजत आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, प्रशासनाची उदासिनता यामुळे शहराचे वैभव असलेली ही शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याची वेळ आली आहे. मात्र शहराचा ऐतिहासिक ठेव जपण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. सोशन मीडियाच्या माध्यमातून शेकडो माजी विद्यार्थी एकत्र आले असून 26 जानेवारीला जिल्हा परिषद शाळेवर झेंडा फ डकविण्यात येणार आहे.
64 वर्षापूर्वी म्हणजे तब्बल 1954 साली जिल्हा परिषद हायस्कुलची स्थापना झाली. शाळेने अनेक विद्यार्थ्यांना घडवत त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. शाळेचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कर्तृत्ववान झाले असून अनेकजण उच्चपदावर कार्यरत आहेत. अशा शाळेला आज अवकाळा आली आहे. एकेकाळी दोन हजार विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत आज बोटावर मोजण्याइतकेही विद्यार्थी नाहीत. शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या दुरावस्थेकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष ही लाजिरवाणी बाब आहे. हे लक्षात आल्याने आता माजी विद्यार्थी शाळा वाचविण्यासाठी पुढे आले आहेत. सर्व विद्यार्थी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत इमारत वाचविण्यासाठी उपाययोजनाविषयी करत आहेत. प्रजासत्ताकदिनी शाळेत स्वच्छता मोहिम राबवून ध्वजारोहण करण्यात येणार आहे. शाळेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची लवकरच व्यापक बैठक घेण्यात येणार आहे. यामुळे आता हायस्कूल पुन्हा उभारी घेईल अशी आशा निर्माण झाली आहे.
हायस्कूलमध्ये 26 विद्यार्थी असून नियमितपणे 10 विद्यार्थी येतात. सध्या मुख्याध्यापक एस. एस. जावळे कार्यरत आहेत. त्यांची वडवणी तालुक्यात नियुक्ती आहे. यामुळे शाळेला कायमस्वरुपी व स्वतंत्र मुख्याध्यापकाची गरज आहे.
हायस्कूलला खेटून जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत. या शाळा एकत्रित हायस्कूलमध्ये भराव्या तसेच प्रशासनाने कर्मचार्यांना सूचना देऊन त्यांची मुले हायस्कूलमध्ये पाठवावी. असे झाले तर शाळेला पूर्वीचे दिवस येतील.
मी मुख्यध्यापक म्हणून हायस्कूलमध्ये अनेक वर्षे काम पाहिले. तेव्हा विद्यार्थी संख्या एवढी होती की बसायला जागा मिळत नसे. आता मात्र शाळेची अवस्था बघून विश्वासच बसत नाही.
: बी.के.शिंदे, माजी मुख्यध्यापकमाझे शिक्षण याच शाळेत झाले आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. पाटोद्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलसाठी पालकमंत्र्याकडे निधीची मागणी करणार आहे. शाळेच्या गतवैभवासाठी माजी विद्यार्थ्यांसोबत सहभागी असून आवश्यक ते सहकार्य करणार आहे.
: रमेश पोकळे, माजी विद्यार्थी तथा भाजप जिल्हाध्यक्ष