Tue, Jul 14, 2020 01:36होमपेज › Marathwada › लुडो नावाच्या नव्या जुगाराचे तरुणाईला वेड

लुडो नावाच्या नव्या जुगाराचे तरुणाईला वेड

Published On: Nov 22 2018 1:18AM | Last Updated: Nov 21 2018 10:44PMबीड : प्रतिनिधी

पत्त्याचे क्लब आणि मटक्याला मागे टाकत लुडो नावाच्या नव्या जुगाराचे तरूणाईला अक्षरश: वेड लागले आहे. चौका-चौकात या जुगाराचे डाव मांडून लाखोंची उलाढाल होत आहे. केवळ तरूणाईच नव्हे तर विद्यार्थी आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे काही गुरूजनही फावल्या वेळेत लुडो खेळताना दिसतात. या नव्या जुगारावर नियंत्रण हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. 

मटका, पत्ते, झन्नामन्ना, सुरट, गुडगुडी असे जुगाराचे अनेक प्रकार आहेत. या जुगाराच्या आहारी जावून संसाराची राखरांगोळी केल्याच्या घटना आजपर्यंत ऐकायला मिळायच्या. मात्र आता बदलत्या काळात मटका, पत्त्याच्या क्लबला लाजवेल इतक्या मोठ्या प्रमाणात मोबाईलवरून लुडो नावाचा जुगार खेळला जात आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही या नव्या जुगाराचे व्यसन लागले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शाळा सुटल्यानंतर तीन-चार गुरूजी एखाद्या चहाच्या हॉटेलवर एकत्र येऊन लुडोचा डाव मांडतात. बीड शहरातील अनेक चहाचे हॉटेल आणि टपर्‍यांच्या परिसरात गुरूजणांनीच लुडोचा डाव मांडलेला दिसतो. अनेक ठिकाणच्या शाळेतही शाळा सुटल्यानंतर किंवा फावल्या वेळेत शिक्षक लोक लुडो खेळताना दिसत आहेत. ज्ञान देणारे गुरूजीच लुडो खेळत असल्याने विद्यार्थ्यांनाही लुडोचा लळा लागू लागला आहेे. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी पाच- दहा रूपयांवर हा जुगार खेळत असले तरी त्याचे भयंकर व्यसन त्यांना लागू लागले आहे. 

हिंगोली जिल्ह्यात लुडो खेळणार्‍यांवर पहिली कारवाई

कळमनुरी तालुक्यातील चुंचा गावाच्या शिवारात मोबाईलवर पैसे लावून लुडो नावाचा जुगार खेळणार्‍या जुगार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या जुगार्‍यांकडून सहा मोबाईल देखील जप्त केला आहे. लुडो या खेळाला जुगार ठरवणारी ही कारवाई मोठी ठरली आहे.