होमपेज › Marathwada › शिवाजी महाराजांची चुकीची वंशावळ; प्रकाशकांनी मागितली माफी

शिवाजी महाराजांची चुकीची वंशावळ; प्रकाशकांनी मागितली माफी

Published On: Dec 14 2018 9:03PM | Last Updated: Dec 14 2018 9:19PM
लातूर : प्रतिनिधी

लातूर येथील निकिता प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अकरावी संस्कृत विषयाच्या प्रश्नसंच पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे नाते चुकीचे दाखवल्याने खळबळ उडाली आहे. जिजाऊ यांना शिवरायांच्या पत्नी असे या वंशावळीत ( ट्री डायग्राम)  छापले गेल्याने यावर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लातूर येथील राजेंद्र शास्त्री (गायकवाड) हे या पुस्तकाचे लेखक असून या प्रकाराबाबत प्रकाशक व लेखकाने एका संयुक्त माफीनाम्यायाद्वारे जनतेची जाहीर माफी मागितली आहे. 

‘संस्कृत सारिका प्रतिदर्श कृतिपत्रिका संच कक्षा एकादशी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकातील चुकीचा मजकूर असलेले पान व्हॉट्सअॅप वरून व्हायरल झाल्यानंतर ही चूक उघड झाली. दरम्यान लेखक राजेंद्र गायकवाड यांनी चूक मान्य केली असून विक्रीसाठी पाठवण्यात आलेली पुस्तके विक्रेत्याकडून परत मागवल्याचे सांगितले. पुस्तकांची विक्री करू नये असेही विक्रेत्यांना कळवल्याचे ते म्हणाले.

दरम्यान व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या या पुस्तकाच्या पानावर असलेल्या विक्रेत्यांच्या फोनवर खात्रीसाठी पुढारीने संपर्क साधला असता त्यांनी  लातूरच्या प्रकाशकाचा फोन आल्याचे व ती पुस्तके विक्री न करता परत पाठवण्याचे फोनवरून कळवल्याचे  सांगितले. लातूर शहरातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे ते पुस्तक मागितले असता ते नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले . विक्रीसाठी ठेवलेल्या या पुस्तकांच्या प्रती प्रकाशक व लेखकाने परत नेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

महाराष्ट्राच्या अस्मितेची बदनामी करणारा हा प्रकार अक्षम्य असून, शासनाने या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक व वितरकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अभ्यासक्रमासाठी या पुस्तकास परवानगी देणारी अभ्यास समितीही या बदनामीस तितकीच कारणीभूत असून, ती बरखास्त करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष वैजनाथ जाधव यांनी केली आहे.