Mon, Jul 13, 2020 07:18होमपेज › Marathwada › नव्या रंगातला, ढंगातला गणवेश मिळणार कधी?

नव्या रंगातला, ढंगातला गणवेश मिळणार कधी?

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 10:27PMअंबाजोगाई  : रवी मठपती 

राज्य परिवहन महामंडळ या न त्या कारणाहून प्रसिद्धीच्या झोतात असते. राज्यात शिवशाहीचे आगमन थाटात  झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांमध्ये एकसंघता दिसून येण्यासाठी सर्व संवर्गागातील कर्मचार्‍यांना रेडीमेड गणवेश देण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला. यासाठी  चार  महिन्यांपूर्वी सर्व कर्मचार्‍यांचे कपड्याचे  मापं घेण्यात आली परंतु अद्यापही नव्या रंगातले व  ढंगातले गणवेश प्राप्त झाले नाहीत. परिणामी कर्मचार्‍यांना जुन्याच खाकी  गणवेशात कर्तव्य पार पाडावे लागत आहे. 

महामंडळाच्या कर्मचार्‍यांमध्ये एकसंघता दिसून येण्यासाठी सर्व संवर्गागातील कर्मचार्‍यांना दरवर्षी दिले जात असलेल्या कापडा ऐवजी रेडीमेड गणवेश देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात  आले. अंबाजोगाई आगारातील 180 चालक, 160 वाहक व 50 मेकॅनिक यांचे मापं चार महिन्यांपूर्वी घेण्यात आले.जानेवारी महिन्यात  प्रातिनिधिक स्वरुपात मोठा गाजावाजा करीत महामंडळाकडून प्रातिनिधीक स्वरूपात एसटीच्या विभागीय कार्यालय स्तरावर गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, परंतु  येथील 390 कर्मचार्‍यांना चार महिन्यांनंतरही हा गणवेश कसला आहे हे पहायला  मिळाले नाही. गणवेशाचे वाटप केव्हा होणार? याबाबत कर्मचार्‍यांना माहिती नाही.  गेल्या अनेक दिवसांपासून नवीन गणवेशाच्या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत.आगार प्रशासनाने विविध संवर्गात काम करणार्या कर्मचार्‍यांची  गणवेशाबाबतची संपूर्ण माहिती एसटच्या वरिष्ठ विभागाला कळविली आहे. वरिष्ठ पातळीवर  गणवेश वाटप कोणत्या कारणाने रेंगाळले आहे?  हे कोणी अधिकारी सांगायला तयार नाहीत. नव्या रंगाच्या व नव्या ढंगाच्या गणवेशाची उत्सुकता कर्मचार्‍यांना लागली असली तरी तूर्तास  सर्व  कर्मचार्‍यांना जुनाच गणवेश परिधान करून कर्तव्य बजावावे लागत आहे.

Tags : Marathwada, When, will, you, get, new, uniform