होमपेज › Marathwada › सेनगाव तालुक्यात पाणीटंचाईचे सावट

सेनगाव तालुक्यात पाणीटंचाईचे सावट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सेनगाव : जगन्‍नाथ पुरी

सेनगाव तालुक्यातील विविध गावांतील निर्माण होणार्‍या पाणीटंचाई निवारण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने चार कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्या आला होता. पहिला टप्पा जानेवारी ते मार्च या कालावधीत तीन कोटी रुपयांच्या उपाययोजनाचा समावेश होता. समिती प्रशासनाने उन्हाळा लागण्यापूर्वी आमसभा घेणे आवश्यक होते. मात्र असे झाले नाही. त्यामुळे आमसभेची औपचारिकता वरातीमागून घोडे नाचविण्यागत प्रकार होतो की काय असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

तालुक्यातील 107 ग्रामपंचायती अंतर्गत 130 गावांचा कारभार पाहिल्या जातो. मागील काही वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण जेमतेम राहत असल्यामुळे जमिनीतील पाणीपातळीत वाढ होत नसून पाणी पातळी खालावत चालली आहे. दरम्यान, पावसाळ्यात पडणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन लावून साठवणुकीसंदर्भात विशेष प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे सातत्याने पाणी प्रश्‍न गंभीर रूप धारण करत आहे.

पूर्वी उन्हाळा सरते शेवटी काही गावांत पाणीटंचाई उद्भवत होती. मात्र मागील काही वर्षांपासून उन्हाळा लागण्या आधीच पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. पंचायत समिती प्रशासनाकडून चार महिन्यांच्या कालावधी ऐवजी सहा महिन्यांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करावा लागत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पहिल्या टप्प्यात दोन कोटी 97 लाख रुपयांच्या विविध उपाय योजनाचा आराखडा तर एप्रिल ते जून या कालावधीत दुसरा टप्पा 1 कोटी 1 लाख रुपये उपाययोजनाचा समावेश यावर्षीच्या आराखड्यात करण्यात आला होता.

उन्हाळ्या पुर्वीच समिती प्रशासनाकडून आमसभा घेणे आवश्यक आहे. मात्र अर्धा उन्हाळा संपत आला कृती आराखड्याचा पहिला टप्प्याचा कालावधी मार्चमध्ये संपला. मात्र अद्याप समिती प्रशासनाकडून आमसभा घेण्याबाबत विशेष प्रयत्न झाले नाहीत. आमसभेमध्ये तालुक्यातील विविध गावांतील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित राहून आवश्यक त्या उपाय योजनांची मागणी केली जाते. त्यामुळे पाणी टंचाईच्या प्रश्‍नाची दाहकता काही प्रमाणात कमी करण्यास मोठी मदत मिळते.

Tags : Marathwada, Marathwada News, Water, shortage, Sengao taluka


  •