Mon, Sep 28, 2020 13:42होमपेज › Marathwada › पवार-पंडित पत्रक वॉर, कार्यकर्त्यांची बेजारी

पवार-पंडित पत्रक वॉर, कार्यकर्त्यांची बेजारी

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 16 2018 10:10PMगेवराई : विनोद नरसाळे

विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेतेही आता भिडू लागले आहेत. गेवराई तालुका आतापर्यंत पंडित विरुद्ध पंडित वादाने राज्यात गाजला होता. आता पवार विरुद्ध पंडित असे वातावरण पेटू लागले आहे. याची सुरुवात कार्यकर्त्यांच्या पत्रक वॉर वरून सुरू झाली आहे.विविध विकास कामांना सुरुवात करून आ. पवार यांनी विधानसभेचे नांदी केली, तर, विजयसिंह पंडित यांनी आ. पवार यांच्या नामधारी गुत्तेदारीवर परखड टीका केली. दोघांचे वार जिव्हारी लागणारे असल्याने शाब्दिक टोल्याला-टोला हा पत्रकबाजीतून सुरू आहे. यात, कार्यकर्त्यांची मात्र नाहक बेजारी होऊ लागली आहे.

गत विधानसभेत दोन्ही पंडित एकत्र आल्यानंतर तालुक्यातील जनतेने दोन्ही पंडितांना नाकारून भाजपचे लक्ष्मण पवार यांना तब्बल 60 हजारांच्या मताधिक्याने निवडून देऊन इतिहास घडविला. वर्षानुवर्षे एकहाती सत्ता असलेल्या पंडितांच्या सत्तेला हादरा दिला, तसेच लक्ष्मण पवार यांनी देखील निवडणुकीदरम्यान पंडितांची मक्तेदारी मोडीत काढून त्यांची तालुक्यातीव कामात असलेली गुत्तेदारी, वाळू, राशनमध्ये असलेली मक्तेदारी मोडीत काढण्याचे जनतेला आश्वासन दिले होते. जनतेने दाखविलेल्या विश्वासास पात्र ठरवत आमदार लक्ष्मण पवार यांनी तालुक्यात विविध विकास कामांचा धडाका लावला, मात्र लक्ष्मण पवार हे दुसर्‍याच्या नावे गुत्तेदारी करून बोगसकामे करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयराजे पंडित यांनी जाहीर कार्यक्रमात केला होता. त्यांनी गेवराई शहर आणि तालुक्यात दुसर्‍याच्या नावावर गुत्तेदारी करून बोगसकामे करत असल्याचा आरोप विजयराजे पंडित यांनी करत त्याचे ज्वलंत उदाहरण शहरातील पाच कोटी रुपयांची नळयोजना आहे. ज्यात पवारांनी स्वतः गुत्तेदारी करून एकाच कामाचे डबल बिल उचलण्याचा घाट घातला जात आहे.  दुसर्‍याच्या नावावर गुत्तेदारी करून बोगस विकासकामे करण्यातच आ. लक्ष्मण पवार कार्यसम्राट आहेत अशी खरमरीत टीका  विजयसिंह पंडित यांनी केली होती. यानंतर या आरोपाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपचे गेवराईचे नगराध्यक्ष सुशील जवंजाळ यांनी उडी घेत विजयराजे पंडित यांच्यावर तोफ डागली. तर नगराध्यक्ष यांच्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरात एकमेव नगरसेवक असलेले राधेश्याम येवले यांनी नगराध्यक्ष हे रबरी शिक्का असल्याचा पत्रक काढून उल्लेख केला, दरम्यान या पत्रकबाजीने तालुक्यातील जनतेची मात्र करमणूक होत असून पंडित-पवार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

नेत्यात टोकाचे वाद

गेवराई मतदार संघात या अगोदरही राजकीय नेत्यांत टोकाचे वाद असल्याचे समोर आले आहे. माजी आ. बदामराव पंडित व अमरसिंह पंडित यांच्यातही या अगोदर हमरीतुमरी झाली होती. त्या अगोदरही अनेकदा वाद समोर आले होते. या वादाचे परिणाम नेत्यांपासून थेट गाव पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांपर्यंत दिसून येत होते. आताही विधानसभा निवडणुका जवळ आल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. 

पत्रकबाजीतून ठिणगी

काही वर्षांपूर्वी नेत्यांचे वाद थेट हमरीतुमरीने सुरू होत. आता मात्र पत्रकबाजी करून वादाला हवा दिली जात आहे. यातूनच आ. पवार विरुद्ध विजयसिंह पंडित यांच्यात तोफ डागल्या जात आहेत. एकमेकांनी केलेली कामे, त्यात झालेला कथीत भ्रष्टाचार यावर बोट ठेवत बाण मारले जात आहेत, तर पंडित सत्तेत असताना त्यांनी काय केले, पंडित यांच्या ताब्यातील संस्था, कारखाना यावर बोट ठेवत प्रहार केला जात आहे. या पत्रकबाजीमुळे कार्यकर्त्यात मात्र तणाव वाढू लागला आहे.