Mon, Jul 06, 2020 04:59होमपेज › Marathwada › विक्रमगड; सामना दुहेरी की तिहेरी?

विक्रमगड; सामना दुहेरी की तिहेरी?

Published On: Sep 22 2019 1:33AM | Last Updated: Sep 22 2019 1:33AM
हनिफ शेख
 

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा ही सर्वात लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र आहे. हा पूर्वीपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जात असला तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने वर्चस्व मिळवले होते. विक्रमगड विधानसभेत युतीचे वर्चस्व असताना, येथे महाआघाडीच्या उमेदवाराला 5 हजार 705 मताधिक्य मिळाले आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये मतदारसंघ मिळविण्यासाठी आणि उमेदवारीसाठी असलेली स्पर्धा, तर महाआघाडीकडून सुनील भुसारा यांचे एकमेव नाव उमेदवारीसाठी पुढे आल्याने आघाडीच्या विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विष्णू सवरा यांना 40 हजार 201, शिवसेनेचे प्रकाश निकम यांना 36  हजार  356, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सुनील भुसारा यांना 32 हजार 53, बहुजन विकास आघाडीचे रामचंद्र गोविंद यांना 18  हजार 85, तर माकपच्या रतन बुधर यांना 13 हजार 152 मते मिळाली होती. महाआघाडीची मतांची गोळाबेरीज 63 हजार 290 तर युतीची 76  हजार 557 इतकी झाली होती. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत महाआघाडीचे अनेक दिग्गज वाहून गेले. मात्र, विक्रमगड विधानसभेत महायुतीचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना 73 हजार 176, तर महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 78 हजार 881 मते मिळाली होती. यावेळी भाजप पदाधिकार्‍यांनी युतीधर्म पाळला नसल्याचा थेट आरोप शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला होता.  

या मतदार संघासाठी युतीत रस्सीखेच सुरू आहे. पुन्हा ही जागा भाजपला दिल्यास शिवसेना एकदिलाने काम करेल? याविषयी कुजबुज सुरू झाली आहे. तसेच स्थानिक उमेदवार हा महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरणार आहे. येथे भाजप आणि राष्ट्रवादीत थेट लढत होणार आहे. युती तुटलीच तर मात्र तिरंगी लढत होण्याचीही शक्यता आहे.