होमपेज › Marathwada › अकरा कलमी कामांना जिल्ह्यात बसली खीळ

अकरा कलमी कामांना जिल्ह्यात बसली खीळ

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 10 2018 12:06AMबीड : दिनेश गुळवे

ग्रामीण विकासाची जननी आणि मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेतून ग्रामीण विकास, रोजगार, सिंचन आदींसाठी शासनाने महत्त्वपूर्ण असा अकरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत विविध 11 प्रकारचे कामे करण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्याता 28 हजारांवर कामे मंजूर झाली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असली तरी या कामांचा श्रीगणेशच होत नसल्याने ग्रामीण विकासाला खीळ बसली जात आहे.  

जिल्हा परिषदेतून ज्या विविध योजना राबविल्या जातात त्यामध्ये रोजगार हमी योजना महत्त्वाची आहे. या योजनेतून शेती कामे आटोपल्यानंतर, हंगामी बेरोजगारी असताना वा दुष्काळ परिस्थितीत कामे उपलब्ध करून दिली जातात. ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा, रस्ते व्हावेत, सिंचन व्हावे, वृक्षलागवड केली जावी, शेततळे व्हावेत आदींसाठी शासनाने महत्त्वाकांक्षी अशी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना हाती घेतली आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असला तरी योजनेतील कामांना कासवगतीने मंजुरी मिळत आहे. पाठविलाला प्रस्ताव, कामांची मंजुरी चार-चार महिने मिळत नसल्याने   योजनेच्या उद्देशालाच खीळ बसली आहे. या अकरा कलमी कार्यक्रमामध्ये विंधन विहिरी, अमृत शेततळे, भू-संजिवनी कल्पवृक्ष फळबाग, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव, अंकूर रोपवाटिका, नंदनवन वृक्षलागवड आदींमध्ये कामे केली जात आहे.

या सर्वांमध्ये यावर्षी बीड जिल्ह्यात तब्बल 28 हजार 925 कामे करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या कामांसाठी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती यांनी काही प्रस्तावही पाठविले आहेत, मात्र यातील बहुतेक प्रस्ताव पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे लालफितीत अडकले आहेत. उन्हाळा सुरू होऊन दोन महिने झाले, आता शेती कामेही आटोपली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांना कामे नाहीत. अशा परिस्थितीत ही कामेही सुरू होत नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात कामे नसल्याने मजूर आता शहरात स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे महत्त्वाकांक्षी अशा या 11 कलमी कार्यक्रमातील कामे सुरू व्हावेत, अशी मजुरांची अपेक्षा आहे. 

Tags : Marathwada, Various, 11 types,  works, rich, Maharashtra Jankalyan Yojana