परभणी : येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडले

Last Updated: Aug 19 2020 1:04AM
Responsive image
धरणातील विसर्ग पाहण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी अरुंद पुलावर लोकांची झालेली गर्दी.


जिंतूर : पुढारी वृत्तसेवा 

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव (राजा) तालुक्यातील खडकपूर्णा धरणाचे ११ दरवाजे उघडल्याने परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण ९६ टक्के भरले. सध्या धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडले असून ४२१९ क्युसेक वेगाने पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यापूर्वीच स्थानिक प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाच्या दोन गेटमधून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची धरण क्षेत्रात गर्दी होत असून ते सेल्फी काढण्यासाठी अरुंद पुलावर येत आहेत. या अरुंद पुलावर अनेक अपघात झाले असून असंख्य दुचाकी चारचाकी वाहने कोसळून अपघात झालेले आहेत. असे असताना सुद्धा लोकांना याची पर्वा नसल्याचे दिसून आले.

धरणाची सुरक्षा रामभरोसे 

पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी तसेच सेल्फी काढण्यासाठी अरुंद पुलावर हौशी पर्यटकांची गर्दी होत असल्याने धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच समोर येत आहे. एलदरी धरणात ७९२.४९० दलघमी इतका दलघमी पाणी साठा झाला असून धरणात जिवंत पाण्याची टक्केवारी ९८ टक्के आहे. तर धरणातील तीन हजार क्युसेक पाणी जलविद्यूत केंद्रातील तीन संचातून पूर्णा नदीपात्रात सोडले जात आहे. परिणामी २२.५० मेगा वॅट वीज निर्मितीला सुरवात होत आहे. जलविद्युत केंद्रांचे सध्या तिन्ही संच कार्यान्वित करण्यात आलेले आहे. असे चित्र असताना देखील येथे धरणाच्या सुरक्षततेसाठी कोणतेच चोख पावले उचलली गेल्याचे दिसत नाही.