Wed, Jul 08, 2020 17:02होमपेज › Marathwada › तुळजापूर : धनेगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

तुळजापूर : धनेगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

Published On: Apr 18 2019 4:41PM | Last Updated: Apr 18 2019 4:09PM
तुळजापूर :  वार्ताहर

तुळजापूर तालुक्यातील धनेगावची शासन दप्तरी पुनर्वसनाची नोंद न झाल्यामुळे धोरणाला कंटाळून ग्रामस्थांनी लोकसभेसाठी मतदान न करण्याचा निर्णय घेऊन बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

तुळजापूर तालुक्यातील धनेगाव येथील ३२५ मतदारांनी लोकसभा मतदानाचा हक्क नाकारून बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव देशमुख यांनी १९९३ साली झालेल्या भूकंपाच्या आपत्तीनंतर संपूर्ण गावाचे पुनर्वसन आपल्या जमिनीवर केले.  मात्र शासनाच्या दप्तरी या पुनर्वसनाची नोंद न झाल्यामुळे गावकऱ्यांचे सर्व प्रश्न रेंगाळत पडले आहेत.  सातत्याने पाठपुरावा करून देखील गेल्या दहा वर्षापासून पुनर्वसनाची शासन दप्तरी नोंद होत असल्याने गावकऱ्यांनी एकत्रित येऊन मतदानावर बहिष्कार  टाकला आहे. 

१९९३ साली भूकंप झाल्यानंतर धनेगाव  हे गाव पूर्णतः रस्त्यावर आले होते. अशा आपत्तीच्या काळात तुळजापूरची नगराध्यक्ष प्रकाशराव देशमुख यांनी आपल्या मालकीची साडेसहा एकर जमीन गावकऱ्यांना पुनर्वसनासाठी दिली.  मात्र त्याचा प्रस्ताव १९९८ मध्‍ये शासनाकडे पाठवून देखील आजपर्यंत मंजूर न झाल्यामुळे गावातील सर्व विद्यार्थी गावकरी शेतकरी शेतमजूर यांच्या अनेक योजनांची कामे रेंगाळत पडलेले आहेत.  शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील ही मागणी मान्य होत नसल्यामुळे यापूर्वी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद अशा दोन निवडणुकांच्या मतदानावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला. यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये देखील हा बहिष्कार कायम ठेवला आहे.  

बहिष्कार टाकणार्‍या गावकऱ्यांमध्ये प्रकाश देशमुख, अर्जुन सुरवसे, अनिल चुडा, अशोक जाधव, मल्लाप्पा जाधव, अनिल डोंगरे, भगवान सुरवसे, सचिन सुरवसे, उमेश शिंदे, विनोद जाधव, राजेंद्र इंगळे, शशिकांत जाधव, मिलिंद खोपडे, अण्णासाहेब जाधव, उमाकांत सुरवसे, अजहर अमर, जाधव सुधाकर, यांच्यासह गावातील ३२५  मतदारांचा समावेश आहे.