Sun, Jul 05, 2020 02:11होमपेज › Marathwada › तुळजाभवानीच्या चैत्र यात्रेत ३ लाख भाविकांनी घेतले दर्शन

तुळजाभवानीच्या चैत्र यात्रेत तीन लाख भाविक

Published On: Apr 19 2019 2:34PM | Last Updated: Apr 19 2019 4:02PM
तुळजापूर : प्रतिनिधी 

प्रचंड उन्हाचे चटके सहन करत हजारो भाविक, भक्तांनी तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेमध्ये मनोभावे देवीचे दर्शन घेतले. दोन दिवस चाललेल्या या यात्रेमध्ये तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले.

तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला बुधवारी सकाळपासून सुरुवात झाली. दिवसभर भक्तांची दर्शनासाठी गर्दी होती. राजे शहाजी महाद्वारातून भाविक भक्तांना प्रवेश दिल्यानंतर दर्शन मंडपातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी रांगा चालल्या. 

मध्यरात्री एक वाजता तुळजाभवानी देवीचे चरणतीर्थ झाल्यानंतर दर्शनाच्या रांगा सुरू झाल्या. त्यापूर्वी रात्री अकरा वाजता तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांची गर्दी अचानक वाढली आणि कळोळ तीर्थावर आंघोळ करण्यासाठी भाविकांनी गर्दी वाढली. यावेळी भक्तांची गर्दी वाढल्‍याने कल्लोळाला वळसा घेऊन टोले  दरवाज्याकडे जाताना लहान मुले, महिला, वयोवृद्ध हे गर्दीमध्ये दाबले गेले. या ठिकाणी अकरा वाजता गर्दी प्रचंड प्रमाणात वाढल्याने रेटारेटीचे प्रकार घडले.

यामुळे या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले. यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याची अफवा पसरली मात्र सकाळी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक अंतुले यांच्याशी संपर्क साधला असता, आपण सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. अशी कोणतीही घटना झालेली नाही. यामध्ये कोणी रागावले अथवा जखमी झालेले नाही असा निर्वाळा देण्यात आला.

प्रत्यक्षात मात्र तुळजाभवानी मंदिराचे दर्शन अकरा वाजता बंद झाले. दर्शन बंद झाल्‍यामुळे गर्दी वाढत गेली, आणि यावेळी गर्दी वाढल्यामुळेच रेटारेटीची घटना घडली. गोमुख तीर्थ आणि कल्लोळतीर्थ एकाच वेळी बंद करण्यात आल्यामुळे भाविक भक्तांना स्नान करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. प्राधिकरणामध्ये बांधलेले कल्लोळतीर्थ देखील बंद होते. त्यामुळे आंघोळ करण्यासाठी भाविक भक्तांची तारांबळ उडाली मात्र भाविकांच्या सोयीसाठी गुरुवारी दुपारी एक वाजता कल्लोळतीर्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगीने चालू करण्यात आले. 

या दरम्यान बुधवारी दिवसभर दीड हजार भाविकांनी दर्शन केल्याची नोंद दिसून आली. सर्वसाधारण दर्शन करण्यासाठी भाविक भक्तांना दीड - दीड तास रांगेत थांबावे लागले. मंदिर संस्थांकडून उन्हापासून संरक्षणासाठी अत्यंत तोकड्या व्यवस्था करण्यात आलेल्या दिसून आल्या. पिण्याच्या पाण्याची देखील कमतरता दिसून आली. दर्शनासाठी भाविक भक्तांचे समाधान करण्यामध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थान मात्र अपयशी ठरल्याचे चित्र सर्व यात्रेमध्ये दिसून आले. यात्रा काळामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे याची जाणीव प्रशासनाला असून देखील प्रशासन उपयोजना करण्यामध्ये का कमी पडते असा सवाल भाविकांमधून विचारण्यात येत आहे.