Mon, Jul 13, 2020 08:36होमपेज › Marathwada › तुळजाभवानीचे मंदिर आता मध्यरात्री एक वाजता उघडणार

तुळजाभवानीचे मंदिर आता मध्यरात्री एक वाजता उघडणार

Published On: Apr 15 2019 7:38PM | Last Updated: Apr 15 2019 7:25PM
तुळजापूर : प्रतिनिधी

मंगळवारी मध्यरात्रीपासून तुळजाभवानीचे मंदिर दर्शनासाठी मध्यरात्री एक वाजता उघडणार आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ जून पर्यंत लाखो भाविकांना २२ तास दर्शन घेण्याचा लाभ मिळणार आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी उन्हाळा सुट्टीच्या कालावधीमध्ये आणि चैत्र यात्रेच्या दरम्यान हजारो भाविकांची गर्दी उसळते. या कालावधीमध्ये भाविक भक्तांचे दही दुधाचे अभिषेक यांची संख्या देखील वाढते. ही बाब लक्षात घेऊन प्रतिवर्षी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीमध्ये मध्यरात्री एक वाजता खुले होते. तुळजाभवानी देवीची चरणतीर्थ पूजा करून दर्शनासाठी मध्यरात्री एक वाजता खुले केले जाते आणि पहाटे पाच वाजता अभिषेकाची गाठ घालून दही दुधाचे अभिषेक आणि श्रीखंडाची सिंहासन महापूजा केल्या जातात. मंगळवारपासून मध्यरात्री एक वाजता तुळजाभवानी देवीचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार असून उन्हाळी सुट्टीतील गर्दीच्या काळात भावीक भक्तांना दर्शनासाठी अधिक वेळ मिळणार आहे, अशी सोय तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.

१९ एप्रिल रोजी तुळजाभवानी देवीची यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर आणि तुळजापूर नगरपरिषद तुळजापूर यांच्यावतीने यात्रेच्या उपाययोजना करण्यासाठीची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. ही यात्रा १७ एप्रिल पासून सुरू होणार असून ती २१ एप्रिल पर्यंत चालणार आहे. छत्री यात्रेच्या शहरातील गर्दीच्या नियंत्रणासाठी सोमवारी दुपारपासून मुख्य रस्ते बॅरेकेटिंग करून बंद केले आहेत. वाहने शहरांमध्ये येऊ नये यासाठीची ही उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.