Tue, Jul 14, 2020 06:41होमपेज › Marathwada › ५६ पिढ्या एकत्र आल्या तरी परभणी सेनेकडेच : उद्धव ठाकरे

५६ पिढ्या एकत्र आल्या तरी परभणी सेनेकडेच : उद्धव ठाकरे

Published On: Apr 16 2019 2:18AM | Last Updated: Apr 16 2019 2:18AM
परभणी : प्रतिनिधी  

मागील अनेक वर्षापासून शिवसेनेला भरभरून यश दिलेले आहे. या मतदारांच्या प्रेमामुळेच विरोधकांच्या 56 पिढ्या एकत्र मैदानात आल्या तरी परभणीचा शिवसेनेचा बालेकिल्‍ला हा नेहमीच कायम राहणार असल्याचा आशावाद शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्‍त केला.

परभणी शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावर सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. लोकसभेची ही निवडणूक देशाच्या भवितव्याला वळण देणारी आहे. भगव्यात जो आज जोश कायम आहे तो विरोधकांमध्ये नाही. त्यांच्या मनात केवळ द्वेष आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोप केले आहेत, त्यांना जनता माफ करणार नाही. राहुलकडे असलेल्या बाल बुध्दीमुळेच ते पंतप्रधानाच्या खुर्चीपर्यंत पोहोचणार नाहीत, असे ठाकरे म्हणाले. हिंदुस्थान हा मर्दांचा देश आहे, इटली नाही असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेचा परभणी हा नेहमीच बालेकिल्‍ला राहिलेला आहे. तुम्ही आतापर्यंत ज्या-ज्या खासदारांना मोठे केले ते तुम्हाला सोडून गेले, पण संजय जाधव हे परत तुमच्यासमोर याच पक्षाकडून आलेले आहेत, असेही ते म्हणाले. 

वादळी वार्‍यामुळे गोंधळ

सभेसाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून लोक मैदानात दाखल होत होती. सभेची वेळ ही पाच वाजताचीच होती. उध्दव ठाकरे हेही दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दाखल झाले होते, पण ते सभास्थळी साडेसात वाजता पोहोचले.. यावेळी वादळी वारे मोठया प्रमाणात आल्याने सभेत गोंधळ उडाला होता. यात एक युवक जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.ज्यांच्या प्रचारासाठी या सभेचा खटाटोप करण्यात आला होता. त्या संजय जाधव यांना सभेदरम्यान आलेल्या वादळी वार्‍यामुळे भाषण करता आले नाही. थेट उध्दव ठाकरे यांनी माईक हातात घेतला.