Sat, Aug 08, 2020 03:30होमपेज › Marathwada › वावटळीने लग्‍नमंडप कोसळला; १२ जखमी

वावटळीने लग्‍नमंडप कोसळला; १२ जखमी

Published On: May 15 2019 1:53AM | Last Updated: May 15 2019 12:45AM
आष्टी : प्रतिनिधी 

लग्नमंडपात वावटळ शिरल्यामुळे मंडपाचे लोखंडी अँगल अंगावर पडून  12 जण जखमी झाले. ही घटना आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. यात तीन वर्‍हाडी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत.

अंभोरा येथील मराठे वस्तीवर मराठे-खाकाळ या कुटुंबीयांचा विवाह सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. सकाळपासूनच लग्नमंडपात लगीनघाई सुरू होती. वर्‍हाडींची गर्दी हळूहळू वाढत होती. नवरदेव परण्या मिरवत असतानाच इकडे लग्नमंडपात अचानक वावटळ शिरली. यात मंडप कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. लोखंडी अँगलचा मार लागल्याने पुष्पा पंडित, सलमा शेख, अंबादास पवार, बाबू थोरात हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर इतर आठ जणांवर अंभोरा आणि चिचोंडी येथे प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. 
दरम्यान, घटना घडली त्या प्रसंगी उपस्थित असलेले संदीप खाकाळ, सुखदेव खाकाळ, संतोष ओव्हाळ, किशोर सोनवणे, संतोष आम्ले यांनी समयसूचकता दाखवित जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. या घटनेनंतर हा विवाह सोहळा साध्या मांडवाखाली पार पडला.