Sat, Apr 10, 2021 20:24
उस्मानाबाद  : स्टाफसोबत साजरा केला वाढदिवस, दुसऱ्या दिवशी आला पॉझिटिव्ह

Last Updated: Apr 07 2021 5:39PM

कळंब : पुढारी वृत्तसेवा

सर्वसामान्य नागरिक कोरोनाची धास्ती घेत आहेत. परंतू सुशिक्षित व जबाबदार असणार्‍या कर्मचारीच जर शासकीय नियम पायदळी तुडवत असतील तर? अशा वेळी एकासोबत अनेकांना शिक्षा भोगावी लागते, असाच काहीसा अनुभव कळंब येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आला. 

कळंब येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तीन दिवसापूर्वी एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तो वाढदिवस बँकेतील सर्व कर्मचारी व काही ग्राहकांनी बँकेतच सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याच्या अगोदर दोन कर्मचाऱ्याच्या कोरोना टेस्ट केल्या होत्या. ज्याचा रिपोर्ट दूसऱ्याच दिवशी पॉझिटिव्ह आला. त्यामूळे वाढदिवसाला हजर असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर बँक सील केली आहे. 

बँकेतील सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी केल्या आहेत. मात्र त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. परंतू ज्या दिवशी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले त्या दिवशी शेकडो नागरिक बँकेत कामानिमित्त आले होते. आता त्यांचीही चाचणी होणे गरजेचे आहे. दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने बँक सील करण्यात आली असली तरीही ग्राहक सेवा केंद्र चालकांसाठी बँक सुरू आहे. त्यामुळे ग्राहक सेवा केंद्रही बंद करणे गरजेचे आहे. कारण ग्राहक सेवा चालकमार्फत सेवा केंद्रावर येणाऱ्या नागरिकांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.