Sat, Jul 04, 2020 00:27होमपेज › Marathwada › जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे रूप पालटतेय

जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे रूप पालटतेय

Published On: Feb 18 2019 1:14AM | Last Updated: Feb 18 2019 12:35AM
बीड: उदय नागरगोजे

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या निर्माणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून भरघोस निधी जिल्ह्याला मिळाला. गत तीन वर्षांत ग्रामीण भागात तीनशे किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाले असून आणखी 615 किलोमीटरच्या रस्त्यांचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे रूप पालटू लागले आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था हा नेहमीच चर्चेचा अन् वादाचा विषय राहिलेला आहे. गत काही वर्षांत ग्रामीण रस्त्यांच्या कामाकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे दिसते. बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मोठा निधी आला असून यातून रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडकच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने तालुकानिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात प्रत्येक गावाची लोकसंख्या, तेथील बाजारपेठ, इतर सुविधा, रस्त्याची स्थिती याबाबत माहिती घेण्यात आली. त्यानुसार प्रत्येक गावाला गुण देऊन क्रम देण्यात आला आहे. क्लॉक रोटेशननुसार सध्या रस्त्याची कामे सुरु आहेत. गत तीन वर्षात 930.60 किलोमीटरच्या 217 रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. यातील 315 किलोमीटरचे 50 रस्ते पूर्ण झाले असून उर्वरित 615 किमीचे 167 रस्ते प्रगतीपथावर आहेत. यासाठी 505 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे, अशी माहिती कनिष्ठ अभियंता सुशील लोंढे यांनी दिली.रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. काही रस्त्यांमध्ये वेस्ट प्लास्टीकचा उपयोग केला जात असून यामुळे रस्ते अधिक काळ चांगल्या स्थितीत राहतील.

2020 पर्यंत पंधराशे किमी रस्ते

मुख्यमंत्री ग्रामसडकमधून गाव तिथे रस्ता हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व गावांना चांगले रस्ते व्हावेत या दिशेने काम करण्यात येत आहे. 2020 पर्यंत 1500 ते 1600 किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरु असल्याचे  ए.एम.बेद्रे यांनी सांगितले.