Sat, Jul 04, 2020 00:55होमपेज › Marathwada › पंकजा मुडेंच्या नेतृत्वाचा कोणाला फायदा झाला, धनंजय मुडेंची विचारणा

पंकजा मुडेंच्या नेतृत्वाचा कोणाला फायदा झाला, धनंजय मुडेंची विचारणा

Published On: Sep 16 2019 8:08PM | Last Updated: Sep 17 2019 1:54AM
परळी वैजनाथ : प्रतिनिधी

गेल्या दहा वर्षांत परळी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व करणाऱ्या विद्यमान पालकमंत्री यांच्या नेतृत्वाचा नेमका मतदारसंघासाठी कोणता फायदा झाला? रोजगार, शेती, उद्योग यासह सामान्य माणसाचे अर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सत्तेचा किती फायदा करुन दिला? याचा विचार केला गेला पाहिजे. याउलट आमच्या ताब्यात असलेल्या संस्था आणि राज्यस्तरावर काम करताना इथली माती व या मातीतल्या माणसाशी निष्ठा, इमान ठेवत काम करण्याचा आपण  प्रयत्न केला आहे. या वास्तवाचे चित्रण प्रसारमाध्यमांनी केले पाहिजे. तसेच परळी मतदारसंघातील विकासाच्या वास्तवाचे विश्लेषण पत्रकारांकडून अपेक्षित असल्याचे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी केले.

ते शहरातील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेस नगर पालिकेने दीड एक्कर दिलेल्या जागेच्या हस्तांतरण व नामफलकाच्या कार्यक्रमावेळी बोलत होते. तालुका ठिकाणच्या पत्रकारांच्या घरासाठी जागा देणारी परळी नगर परिषद ही राज्यातील एकमेव व परळी हे पहिले शहर ठरले आहे.  

यावेळी विधान परिषद विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्यासह नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे, सौ.राजश्री धनंजय मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नगरसेवक चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष  जाबेर खान पठाण, उपनगराध्यक्ष अय्युब पठाण, शिक्षण सभापती संजय फड, प्रा. डॉ. विनोद जगतकर, दत्ता पाटील, रणजित लोमटे आदी मान्यवर उपस्थित होते.     

परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या गृहनिर्माण संस्थेसाठी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी परळी न.प.च्या माध्यमातून शहरातील नंदागौळ रोडवर जागा उपलब्ध करुन दिली आहे. तालुक्याच्या ठिकाणी नगर पालिकेच्या माध्यमातून पत्रकारांच्या गृहनिर्माणसाठी जागा  देणारी परळी नगर परिषद पहिली ठरली आहे.

यावेळी पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की, परळीचे लोकप्रतिनिधी राजकीय द्वेषापोटी राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थांच्या विकासात आडकाठी आणतात. सुडाचे हे राजकारण आपण कधीच केले नाही, आणि करणार नाही. इथल्या मातीशी इमान व या मातीतल्या  माणसाच्या सर्वांगीण उन्नतीचे ध्येय उराशी बाळगून आपण काम करत आहोत. आपली कोणाशीही लढाई नाही किंवा राजकारण काही मिळावे यासाठी नाही. इमानेइतबारे राबत असताना परळीची जनता म्हणुन पाठीशी उभे रहावे, एवढी अपेक्षा व्यक्त करताना या मातीतील माणुस आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, त्याचे दरडोई उत्पन्न दुप्पट व्हावे हे आपले स्वप्न असून, संधी मिळाल्यास ते करून दाखवण्याची धमक आहे, त्यासाठी आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.   .