Tue, Jul 14, 2020 00:11होमपेज › Marathwada › वन परिक्षेत्र अधिकार्‍यासह तिघांना लाच घेताना पकडले

वन परिक्षेत्र अधिकार्‍यासह तिघांना लाच घेताना पकडले

Published On: Aug 03 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 12:29AMबीड ः प्रतिनिधी 

वडिलांच्या नावे असलेली आरा मशीन मुलाच्या नावावर करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वन परिक्षेत्र अधिकारी लालाजी दिवाण, वनपाल शिवाजी कांबळे आणि खासगी वाहनचालक राहुल मोरे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खासबाग रोडवरील वन विभागाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. 

गेवराई येथील वडिलांच्या नावे असलेली आरा  मशीन स्वत:च्या नावावर करण्यासाठी तक्रारदार गेल्या काही दिवसांपासून वन विभागातील अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करत होते. सदरील आरा गिरणी मशीन नावे करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी लालाजी बाबासाहेब दिवाण व अन्य दोघांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील व त्यांच्या टीमने खासबाग रोडवरील वन विभागाच्या कार्यालयात सापळा लावला.

याठिकाणी तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना वन परिक्षेत्र अधिकारी लालाजी बाबासाहेब दिवाण, वनपाल शिवाजी सीताराम कांबळे आणि खासगी वाहनचालक राहुल दत्ता मोरे या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. बीड शहर ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.