Sun, Jul 05, 2020 07:09होमपेज › Marathwada › देगलुरात इच्छुकांची भाऊगर्दी

देगलुरात इच्छुकांची भाऊगर्दी

Published On: Sep 23 2019 1:56AM | Last Updated: Sep 22 2019 8:18PM
रत्नाकर जाधव

देगलूर (जि. नांदेड) मतदारसंघ पुनर्रचनेत अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. 2009 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना व अपक्ष अशी तिरंगी लढत झाली होती. यात काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा 6011 मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती न झाल्यामुळे भाजपकडून भीमराव क्षीरसागर व शिवसेनेकडून सुभाष साबणे हे उभे राहिले होते. परंतु, शेवटच्या टप्प्यात नाट्यमयरीत्या भाजपच्या गटाने सुभाष साबणे यांना साथ दिल्यामुळे साबणे यांनी काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांचा 8548 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66852, काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर यांना 58204, भाजपचे भीमराव क्षीरसागर यांना 20542 तर अपक्ष मारोती वाडेकर यांना 12 हजार मते मिळाली होती.2009 ते 2014 पेक्षाही विपरीत परिस्थिती 2019 ची आहे.

शिवसेनेकडून विद्यमान आमदार सुभाष साबणे हे एकमेव तर भाजपकडून भीमराव क्षीरसागर, मधुकर गिरगावकर, धोंडिबा कांबळे, काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर, प्रा. कविता सोनकांबळे, तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. रामचंद्र भरांडे, निवृत्ती कांबळे, प्रा. उत्तमकुमार कांबळे इच्छुक आहेत. या मतदार संघात भाजपचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर व जि. प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांचे प्राबल्य असल्यामुळे त्यांचाही निर्णय महत्त्वाचा समजला जातो. गेल्या पाच वर्षांत या मतदार संघात आमदार सुभाष साबणे यांनी विकास कामे केली आहेत. त्यामुळे आ. सुभाष साबणेंबरोबर कोणाची लढत होणार आहे, हे उमेदवारीनंतर स्पष्ट होईल. देगलूर व बिलोली या दोन तालुक्यांतील गावांचा मतदार संघात समावेश होतो. देगलूर तालुक्याला झुकते माप देत बिलोली तालुक्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप बिलोलीचे मतदार करीत आहेत.