Fri, Jul 10, 2020 16:23होमपेज › Marathwada › जिल्हा परिषदेची बिंदु नामावलीच सदोष

जिल्हा परिषदेची बिंदु नामावलीच सदोष

Published On: Nov 20 2018 1:00AM | Last Updated: Nov 19 2018 10:04PMबीड : प्रतिनिधी

राज्यातील बावीस जिल्हा परिषदेच्या बिंदुनामावलीत स्थानिक लोकसंख्या अधिक असलेला प्रवर्ग अतिरिक्‍त आहे. असे असतानाही एकट्या बीडमधील शिक्षकांवर कारवाई का? असा सवाल उपस्थित करून एन.टी. प्रवर्ग अस्तित्वात येण्यापूर्वी सेवेत रूजू झालेेल्या शिक्षकांनाही बिंदुनामावलीत एन.टी. प्रवर्गात समाविष्ट केले आहे. बीड जिल्हा परिषदेची बिंदुनामावलीच सदोष असल्याने अंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना दिलेले कार्यमुक्‍तीचे आदेश तत्काळ रद्द करावेत अशी मागणी करत 279 शिक्षकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

बीड जिल्हा परिषदेत 2014- 15 मध्ये अंतर जिल्हा बदलीने 926 शिक्षक रूजू झाले. कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून गेल्या चार वर्षापासून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हे शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत. यापैकी 279 शिक्षकांना बिंदू नामावलीनुसार अतिरिक्‍त ठरवून मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी बीड जिल्हा परिषदेतून कार्यमुक्‍त केले आहे. वास्तविक पाहता बिंदू नामावली आणि प्रवर्गनिहाय अनुशेष पाहणे अधिकार्‍यांचे काम आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळीकर यांनी अंतर जिल्हा बदल्यांचा बाजार मांडून बिंदू नामावलीकडे दुर्लक्ष केले. अधिकार्‍यांनी केलेल्या पापाची शिक्षा चार पाच वर्षानंतर शिक्षकांना भोगावी लागत आहे. या प्रकाराने बीडच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यमुक्त केलेले शिक्षक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शिक्षकांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. बिंदु नामावली पाहणे ही अधिकार्‍यांची जवाबदारी आहे.

त्यांनी ती पाहीली नाही यात आमचा शिक्षकांचा दोष काय? राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीत स्थानिकला अधिक लोकसंख्या असलेला प्रवर्ग अतिरिक्त आहे. प्रत्येक प्रवर्गाचा कुठे ना कुठे अनुशेष शिल्लक असताना एकट्या बीड जिल्हा परिषदेतील शिक्षकांवर कारवाई का? एन. टी. प्रवर्ग अस्तीत्वात नसताना खुला आणि ओबीसी प्रवर्गातून सेवेत रूजू झालेल्या शिक्षकांना बिंदु नामावलीत ओबीसी किंवा खुल्या प्रवर्गात गृहीत धरणे अपेक्षीत असताना त्यांचा एन.टी. प्रवर्गात समावेश केला आहे. यामुळे बिंदु नामावलीत एन.टी. प्रवर्गाचे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. जिल्हा परिषदेची बिंदु नामावली सदोष असून सीईओंचे कार्यमुक्तीचे आदेश रद्द करावेत अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. 

कार्यमुक्‍त पण पुढे काय? 

मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीनंतर अंतर जिल्हा बदलीने आलेल्या 279 शिक्षकांना तडकाफडकी कार्यमुक्त केले. त्यांना पूर्वीच्या जिल्ह्यात जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. वास्तविक पाहता ऑनलाईन बदल्यांमुळे प्रत्येक जिल्ह्यात तेथील अनुशेषानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. रिक्त जागा भरण्यात आल्या आहेत. बीड मध्ये अतिरिक्‍त ठरलेल्या आणि मुख्याधिकारी येडगे यांनी कार्यमुक्त केलेल्या त्या 279 शिक्षकांना मुळ जिल्हा सेवेत कसा समावून घेणार? 

बीड जिल्हा परिषदेतील 279 शिक्षकांना एका दिवसात कार्यमुक्त केल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. कारण शैक्षणिक वर्ष अर्धे संपले आहे. निम्मा अभ्यासक्रम शिकवून झाला आहे. या परिस्थितीत शिक्षक कार्यमुक्त झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? रिक्त झालेल्या जागेवर नविन शिक्षक कधी येणार? असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

चुकीच्या पध्दतीने बिंदुनामावली बनविल्याचा निषेध

सामान्य प्रशासन विभागाच्या जीआर नुसार (18 ऑक्टोबर1997) बिंदुनामावलीचा वापर करताना  काही मार्गदर्शक तत्वे निश्‍चित करण्यात आली आहेत. मागास प्रवर्गाना विहित केलेले आरक्षण हे टक्केवारी नुसार आसावे व 52 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, सरळ सेवा आणि पद्दोन्नतीसाठी वेगळी बिंदुनामावली ठरवावी, बदली प्रतिनियुक्त्यांच्या पदांना बिंदुनामावली वापरू नये, मागासवर्गीय पदासाठी छोट्या संवर्गाचे गट तयार करण्यात यावेत, आरक्षण हे संवर्गाच्या टक्केवारी नुसार लावावे,  अ,ब,क,व,ड या प्रवर्गातील आरक्षण आंतर परिवर्तनीय असेल, गुणवत्तेवर नियुक्त झालेल्या मागासवर्गीय कर्मचार्याची गणना मागास प्रवर्गात करू नये असे स्पष्टपणे सांगितले आहे. या नियमावलीचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भंग केला आहे. याचा आम्ही जाहिर निषेध करतो असे रामराव लव्हारे यांनी म्हटले आहे.