गेवराई : प्रतिनिधी
उठ तांडो, वटा दांडो, अन्याय करेवाळेरो, फोड मुंडो (सर्वांनी एकत्र येऊन अन्याय करणार्याचे तोंड फोडा) यासह बंजारा बोली भाषेतील घोषणांनी गेवराईतील आंबेडकर चौक परिसर दणाणून गेला होता. वडवणी तालुक्यातील स्वाती राठोड मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजबांधवांनी एकत्रित येत सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात विद्यार्थ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वडवणी तालुक्यातील स्वाती राठोड या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणातील आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. फरारी आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावे, राठोड कुटुंबीयास आर्थिक मदत द्यावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासह इतर मागण्यासाठी सोमवारी बंजारा समाजाच्या वतीने येथील शिवाजी चौकातून मोर्चा काढण्यात आला.
यानंतर आंबेडकर चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. दरम्यान सपोनि राजाराम तडवी, पोलिस उपनिरीक्षक भुषण सोनार यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात बंजारा क्रांती दलाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, पी.टी.चव्हाण, बाबुराव जाधव, अण्णासाहेब राठोड, गणेश चव्हाण, सर्जेराव जाधव, अंबादास सांगळे, अप्पासाहेब चव्हाण,अनिल राठोड, नितीन चव्हाण, मोहन जाधव तसेच बंजारा समाजातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.