बीड : प्रतिनिधी
कोणत्या समारंभात, सभांमध्ये जातीयवादी लढाई लढली पाहिजे असा टाहो आ. जयदत्त क्षीरसागर करतात, परंतु दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ‘जिसके साथ तेली वो भाग्यशाली’असे वक्तव्य केले. निवडणुकांमध्ये सर्व धर्मियांची मते घ्यायची, संदिग्धता निमार्ण करून स्वतःच जातीय उद्घोषणा करायची ही दुर्दैवीबाब असल्याचा आरोप माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी केला.
बीड शहरातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष शिवलाल मुळूक यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना नवले म्हणाले की, स्व. काकूंपासून आतापर्यंत विविध जाती-धर्माच्या लोकांनी मिळून क्षीरसागरांना राजकारणात सत्तेच भरभरून दान टाकलेल आहे. त्यांच्याकडे आमदारकी, नगराध्यक्षपद, नगरसेवक, जि. प. सदस्य सहकारातील विविध पदे आहेत, असे असताना ते फक्त आपल्या जाती पुरताच विचार करत असल्याचे त्यांच्या दिल्ली येथील विधानातून स्पष्ट होत आहे.
एकीकडे क्षीरसागर जाती तोडो, समाज जोडो असे विविध कार्यक्रमातून संदेश देतात आणि दुसरीकडे मात्र दिल्लीला जाऊन आपल्या जातीच्या चिपळ्या वाजवतात असा आरोप त्यांनी केला. दुसरा मुद्दा उपस्थित करताना नवले म्हणाले की, ईव्हीएम मशीनबाबत सर्वत्र संशयकल्लोळ आहे. काँग्रेसने याबाबत आवाज उठवला आहे. ईव्हीएममधील प्रोग्रामिंग कोडला छेडले जाऊ शकते असा दावा करत पुन्हा बॅलेटपेपरद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.