Wed, Jul 15, 2020 16:20होमपेज › Marathwada › उजनीचे पाणी पिण्यायोग्यच; राज्य प्रयोगशाळा

उजनीचे पाणी पिण्यायोग्यच; राज्य प्रयोगशाळा

Published On: Jan 07 2019 7:18PM | Last Updated: Jan 07 2019 7:18PM
उस्मानाबाद : प्रतिनिधी

'शहराला पाणीपुरवठा जेथून होतो त्या उजनी धरणाचे पाणी पिण्यायोग्य नाही’, हा सोलापूर विद्यापीठातील संशोधकांचा निष्कर्ष राज्य प्रयोगशाळेच्या अहवालामुळे खोटा ठरला आहे. उजनीचे पाणी पिण्यायोग्य असून त्यात कोणतेही अपायकारक घटक नाहीत, असे राज्य प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे.

गेल्या महिन्यात सोलापूर विद्यापीठातील संशोधकांचे उजनी पाण्याच्या संशोधनावरील निष्कर्ष समोर आल्यानंतर उस्मानाबादकरांची झोप उडाली होती. मागील पाच वर्षांपासून उस्मानाबादकरांची तहान उजनी धरणावरच भागत असल्याने या निष्कर्षांमुळे उस्मानाबादकर घाबरुन गेले होते. लोकप्रतिनिधी या नात्याने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी याची तातडीने दखल घेत या पाण्याची चाचणी राज्य प्रयोगशाळेमार्फत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी जिल्हा आरोग्य शाळेमार्फत पाणी नमुने घेऊन ते पुणे येथील राज्य प्रयोगशाळेत जमा केले. तिथे याची तपासणी होऊन हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले. 

या प्रयोगशाळेत शिसे व पारा या घटकाबाबत चाचणी होत नसल्याने हे पाणी नमुने पुढे फुड हायजिन अँड हेल्थ लॅबोरेटरीकडे जमा केले. त्या प्रयोगशाळेचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. या पाण्यात शिसे व पारा या घटकांचे प्रमाण अनुक्रमे ०.००१ व ०.००५ इतके अत्यल्प आढळले. हे प्रमाणही आयएस मानांकनाच्या प्रमाणात असल्याने या पाण्याचा मानवी शरीराला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती आ. पाटील यांनी दिली.