मुदखेड :
काश्मीरमध्ये गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांपैकी सहा जणांनी मुदखेड येथे केंद्रीय राखीव दल पोलिस केंद्रात आठ आठवड्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले होते. या जवानांच्या आठवणींनी केंद्राचा परिसर शुक्रवारी हळहळला.शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना त्यांनी मुदखेड येथे सीआरपीएफचे प्रशिक्षण केंद्र 1994 मध्ये आणले होते.
या केंद्रात केंद्रीय दलात सेवा बजावित असणार्या कर्मचार्यांना ठराविक मुदतीचे प्रशिक्षण दिले जाते. पुलवामा हल्ल्यातील शहिदांची नावे कळाल्यानंतर स्थानिक अधिकार्यांनी नावांची तपासणी केली. तेव्हा सहा जण मुदखेड येथून काही दिवसांपूर्वी प्रशिक्षण घेऊन रवाना झाले होते, असे स्पष्ट झाले. केंद्राचे पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी ही माहिती दिली. जी. सुब्रमण्यम (82 बटालियन) गुरू एच (82 बटालियन), हेमराज मीणा (61 बटालियन), प्रसन्न साहू (61 बटालियन), रतन कुमार ठाकूर (गु्रप सेंटर, काठगोदाम), व अश्विन काओची (35 बटालियन) ही त्यांची नावे आहेत. मुदखेड येथील केंद्रात शुक्रवारी शोकसभा घेण्यात आली.