Tue, May 26, 2020 15:06होमपेज › Marathwada › संशयित रूग्णाच्या संपर्कात उस्मानाबादेतील सात जण

संशयित रूग्णाच्या संपर्कात उस्मानाबादेतील सात जण

Last Updated: Mar 31 2020 7:23PM

संग्रहित छायाचित्रउस्मानाबाद : पुढारी वृत्तसेवा 

नवी दिल्ली येथे उपचार घेत असलेल्या कोरोना संशयित रुग्णाच्या संपर्कात उस्मानाबाद जिल्ह्यातील सातजण आले आहेत. या सर्वांची नावे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे. 

याबाबतची माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राज गलांडे यांनी सांगितले की, नवी दिल्ली येथे कोरोना संशयीत रुग्णावर उपचार सुरू आहेत. येथील प्रशासनाने या संशयिताच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम दिल्ली प्रशासनाने सुरू केले आहे. मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून ही माहिती संकलित केली जात आहे. त्यानुसार मिळवलेल्या नावांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील सात जण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्वांची नावे पत्त्यासह दिल्ली प्रशासनाने उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाकडे पाठवली आहेत. यामुळे जिल्ह्यातील यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. या सातही नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया तातडीने आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. दरम्यान, आजपर्यंत जिल्ह्यात एकही संशयित आढळला नसल्याने काहीसे निश्चिंत असलेल्या उस्मानाबादकरांमध्ये आता खळबळ उडाली आहे. 

अनेकदा जिल्हा प्रशासनाच्या आदेशाकडे कानाडोळा करत अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीचे निमित्त करून शहरभर फिरत होते. आता संशयितांच्या संपर्कात असलेल्यांची नावेच प्राप्त झाली असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे टेन्शन वाढणार आहे. नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे हे सातही जण जिल्ह्याच्या विविध भागातील आहेत. उस्मानाबाद शहर, उमरगा तालुका, लोहारा तालुका, वाशी तालुका व कळंब या तालुक्यांचे टेन्शन वाढणार आहे