Wed, Jan 20, 2021 22:05



हिंगोली : सतीश चव्हाण विजयाची हॅट्रिक करणार : अब्दुल सत्तार 

Last Updated: Nov 27 2020 9:45PM




हिंगोली : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण मागील दोन टर्म पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. पदवीधरांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पदवीधर मतदार सतीश चव्हाण यांना मते देणार आहेत. यामुळे सतीश चव्हाण हे विजयाची हॅट्रिक करणार, असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी (दि. 27) हिंगोली येथे बोलताना व्यक्त केला.

येथील शिवलिला लॉन्स येथे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.27) सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर, खा. हेमंत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष गनाजी बेले, आ. संतोष बांगर, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मानिष आखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांचा मतपत्रिकेत पहिला क्रमांक आहे. मतमोजणी नंतरही ते पहिल्याच क्रमांकावर राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक जीवाचे रान करून सतीश चव्हाण याना निवडून आणतील. चव्हाण यांची काम करण्याची पद्धत आणि सर्वाना सोबत घेऊन चालण्याची कार्यशैलीमुळे ते यंदाच्या निवडणुकीत हॅट्रिक करतील असा विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

भाजपचा समाचार घेताना राज्यमंत्री सत्तार म्हणाले की, भाजप हा जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम करत असून बहुजनांकडे सत्ता जायला नको या मानसिकतेने शंभर टक्के राजकारण करत आहे. ते आता जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या नेत्यांना 'सत्ता मिळणार सत्ता मिळणार' असे गाजर कार्यकर्त्याना दाखवावे लागत आहे. वास्तविक पाहता आता त्यांना पुढील पंचवीस वर्ष सत्ता मिळणार नसल्याचा दावा राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी केला. 

या सभेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, जावेद राज, उद्धव गायकवाड, डॉ. रमेश शिंदे, परमेश्वर मांडगे, दिलीप बांगर, बाजीराव सवंडकर, सुधाकर मेटकर, परसराम हेंबाडे, परमेश्वर इंगोले आदींची उपस्थिती होती. 

खोतकरांनी घेतला दानवेंच्या वक्तव्याचा समाचार 

दोन महिनेच काय यापुढे कधीच आता तुमची सत्ता येणार नाही. पक्षातील लोक सांभाळण्यासाठी सत्ता येणार असे तुम्हाला म्हणावे लागत असल्याचा टोला माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी खासदार रावसाहेब दानवे यांना लगावात त्यांच्या दोन महिन्यात सत्ता येणार या वक्तव्याचा समाचार घेतला. शिवाय या सभेवेळी माजी मंत्री खोतकर यांनी पदवीधर मतदारसंघातून विकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना विजयी करण्याचे आवाहन केले.