Thu, Jul 09, 2020 22:47होमपेज › Marathwada › नदीजोड : मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करणार 

नदीजोड : मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करणार 

Published On: Apr 16 2019 2:18AM | Last Updated: Apr 16 2019 2:18AM
लातूर : प्रतिनिधी

पुरेशा पाण्याअभावी मराठवाड्याची माती आणि माणसाचे वाळवंट होत आहे. तथापि, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करणार आहोत, असे आश्‍वासन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिले.

 भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, पश्‍चिम घाटातील वाहून जाणारे व गुजरातेतील समुद्राला मिळणारे पाणी आम्ही मोठे धरण बांधून अडवणार आहोत. हे पाणी गोदावरीत सोडणार आहोत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने जायकवाडी धरण शंभर टक्के भरेल. शिवाय गोदावरीवरील सर्वच धरणांत बारमाही पाणी राहील. पश्‍चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यालाही याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पात दमणगंगा-पिंजाळ व नारपार -तापी-नर्मदा या नद्यांचा समावेश आहे. तापी नर्मदा हा प्रकल्पाचा करार शेवटच्या टप्प्यात आहे. या प्रकल्पामुळे मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्याचा पाणी प्रश्‍न मार्गी लागणार आहे. आपल्याकडे पाण्याची कमी नाही तर पाणी नियोजनाची कमतरता आहे. जलवाढीसाठी जलसंवर्धन कार्यक्रम ाबवले पाहिजेत. आता आम्ही कॅनॉलऐवजी पाइपलाइनने पाणी देणार असून सिंचनासाठी ठिबकचा वापर करावयास लावणार आहोत. यामुळे तीन टक्के पाण्याची बचत होऊन उत्पादनात अडीच टक्के वाढ होणार आहे. प्रगतीसाठी वीज, पाणी, दळणवळणाची साधने व संपर्क सुविधा महत्त्वाच्या असून केवळ ज्वारी व गव्हावर शेतकरी समृद्ध होणार नाहीत. यासाठी पीक पद्धती बदलावी लागेल. जैवइंधन निर्मिती हा त्यास समर्थ पर्याय असल्याचे ते म्हणाले. दुष्काळ व पाणीटंचाई हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप असल्याची टीका त्यांनी केली. 
देशाला मजबूर पंतप्रधानांपेक्षा मजबूत पंतप्रधानाची गरज असून नरेंद्र मोदी हे मजबूत पंतप्रधान आहेत. देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. संभाजीराव पाटील यांनी लातूरचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी गडकरी यांना केली

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आत्म्याला श्रद्धांजली

आघाडी सरकारच्या काळात पन्नास टक्के काम होऊन अर्धवट राहिलेले महाराष्ट्रातील 26 जलप्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने 40 हजार कोटींचा निधी दिला आहे; असे देशात पहिल्यांदाच घडले आहे. आमची ही मदत म्हणजे आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्म्यास दिलेली श्रद्धांजली असल्याचा टोमणा गडकरी यांनी लगावला. 

भलत्यांची पोरे आमच्या मांडीवर

लग्‍न भलत्यांचे झाले. पोरे त्याला झाली. त्यांना मांडीवर खेळविण्याची जबाबदारी माझ्यासह देवेंद्र फडणवीसांवर पडली. तेही बाबा बाबा म्हणून आम्हाला चिपकले, असा टोला राज्यात अर्धवट राहिलेल्या धरणांच्या कामावरून गडकरी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तत्कालीन सरकारला लगावला.