Fri, Sep 18, 2020 12:51होमपेज › Marathwada › 'कांद्यावर लावलेली निर्यात बंदी हटवा' 

'कांद्यावर लावलेली निर्यात बंदी हटवा' 

Last Updated: Sep 17 2020 11:41AM
शेतकरी संघटनेचे पोलिस प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन

बोरी (परभणी) : प्रतिनिधी  

केंद्र सरकारने अचानक बेकायदेशीररित्या कांदा निर्यात बंदी घातल्याचे वृत्त समजल्यानंतर शेतकरी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष अनिल घनवट यांनी कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन करण्याचे ठरवले. त्यानुसार, केंद्र सरकारला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिंतूर तालुक्यातील मौजे बोरी येथील पोलिस ठाण्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठवले.   

दि. ५ जून २०२० रोजी केंद्र सरकारने तीन आध्यादेश काढले आहेत. त्यामध्ये कांदा /बटाटा /धान्य /कढधान्य /तेल वर्गीय पीके हे सर्व शेतमाल जीवनावश्यक यादीमधून काढले. या निर्णयाचे शेतकरी संघटनेने स्वागतही केले. पण, विदेशामधून कांद्याला मागणी वाढली व कांदा निर्यातीमुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसा मिळू लागला, तोपर्यंत केंद्र सरकारने अचानक बेकायदेशीर निर्यात बंदी केली. परिणामी, २७ रूपये किलो विकत असलेला कांदा ७ रूपये किलो विकू लागला.

बेकायदेशीर लावलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा जिंतुर शेतकरी संघटना तीव्र निषेध करत आहे. सर्वच शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरुपी उठवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. हे निवेदन पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चंद्र मार्कड यांना दिले आहे. यावर परभणी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, सय्यद कलीम पटेल, संतोष गबाळे, माधव खरात, मोसिन काजी, विनायकराव देशमुख, नंदकुमार जेवणे, उद्धव डोंबे, राजा भाऊ गोरे, दत्तराव शिंपले, निवेदनावर आदी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 

 "