Tue, Aug 11, 2020 21:02होमपेज › Marathwada › सेक्सला नकार दिल्याने पतीने पत्नीला पेटवले

सेक्सला नकार दिल्याने पतीने पत्नीला पेटवले

Published On: Sep 27 2018 3:20PM | Last Updated: Sep 27 2018 3:20PMबीडः प्रतिनिधी

सेक्सला नकार दिल्यामुळे पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. बुधवारी रात्री आठच्या सुमारास बीड शहरातील ढगे कॉलनीत ही धक्‍कादायक घटना घडली. यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास पत्‍नीचा मृत्यू झाला.

सायरा पठाण (वय २३ रा. ढगे कॉलनी, बीड) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती आयुब पठाण हा मिस्त्री काम करतो. पठाण कुटुंबीयास एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. पेठ बीड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बडे यांनी याबाबत सांगितले की, सायरा पठाण व तिचा पती आयुब पठाण यांनी बुधावारी रात्री सोबत जेवण केले. त्यानंतर ‘माझ्या सोबत झोप’ अशी विचारणा आयुबने सायरा हिच्याकडे केली. सकाळपासून उपाशी असून तब्येत खराब असल्याने झोपण्यास तिने नकार दिला. त्यामुळे आयुब संतप्‍त झाला. त्याने स्टोव्हमधील रॉकेल एका मग मध्ये काढून सायराच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले व घरातून पळून गेला. 

सायराचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. तात्काळ तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पेठ बीड पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. या घटनेत सायरा ही ७७ टक्के भाजली होती. रात्रभराच्या उपचारानंतर  गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आयुब पठाण विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यास नाळवंडी परिसरातून गुरुवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले.