Sun, Sep 27, 2020 03:42होमपेज › Marathwada › पोटच्या गोळ्याकडून वडिलांवर अंत्यसंस्कारास नकार !

पोटच्या गोळ्याकडून वडिलांवर अंत्यसंस्कारास नकार!

Last Updated: May 28 2020 1:36AM
उस्मानाबाद : पुढारी वृत्तसेवा

उक्कडगाव (ता. परंडा) येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अगदी पोटच्या गोळ्यानेही अंत्यसंस्कार करण्यास असमर्थता व्यक्त करत मृतदेह  स्वीकारण्यास नकार दिला. अखेरीस कायदेशीर प्रक्रिया पार पाडत उस्मानाबाद पालिकेनेच अंत्यविधी उरकले. कोरोनाची अनाठायी भीती माणुसकीलाही बोथट करत असल्याचे यानिमित्ताने उस्मानाबादकरांना पाहावयास मिळाले.

उक्कडगाव येथील मुंबईतून गेलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परंडा येथील उपजिल्हा रुग्णायलयातील कोरोना कक्षात तिच्यावर उपचार सुरू होते. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. यात तिचे पती भागवत पवार यांचेही स्वॅब घेण्यात आले, परंतु त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. पण पवार यांना दमा तसेच अन्य आजार होते. त्यामुळेच ते आजारी होते. पुढील उपचारासाठी त्यांना उस्मानाबादेत दाखल करण्यात आले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. त्यांचे दोन्ही स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याची कल्पना डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला व नातेवाईकांनाही दिली. तरीही मुलाने मृतदेह स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत अंत्यविधीपासूनही हात झटकले. अगदी जवळच्या नातेवाईकांनीही या प्रकरणात हात वर केले. अखेर रुग्णालय प्रशासनाने दोन दिवस प्रतीक्षा केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर बुधवारी दुपारी पालिकेच्या चार कर्मचार्‍यांनी पवार यांच्यावर शहरातील कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

 "