हिंगोलीत पावसामुळे खरीप पिके जोमात

Last Updated: Jul 15 2020 12:18PM
Responsive image
शेतात खरिपाच्या पिकाची पेरणी करत असताना शेतकरी


जवळाबाजार (हिंगोली) : पुढारी वृत्तसेवा   

यावर्षी खरीप हंगामातील पेरणी मृग नक्षत्रात पावसाचे वेळेवर आगमन झाल्याने परिसरात खरिपाच्या पिकाची पेरणी ही मोठ्या प्रमाणात झाली. सध्या निसर्गाच्या कृपेने पिकास उपयुक्त पाऊस पडत असल्याने परिसरात खरीपाची पिके जोमदार दिसत आहेत.  

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर यावर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाले. त्यातच देशात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणू पसरल्याने शेतकरी बांधवास खरिपाची बी-बियाणे, खते वेळेवर मिळाली नाहीत. तर मोठ्या प्रमाणात बियाणाची टंचाई निर्माण झाली. यामुळे शेतकरी बांधवांनी कृषी विक्रेत्यांकडून मिळेल त्या कंपनीच्या बियाणाची पेरणी केली. यामध्ये बऱ्याच प्रमाणात सोयाबीन बियाणाच्या व उगवण शक्तीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या. पण शेतकरी बांधवांनी काही ठिकाणी दुबार पेरणी करून खरिपाची पेरणी आटोक्यात आणली आहे. 

मागील महिन्यापासून खरीपाच्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि हळद पिकास उपयुक्त असा पाऊस पडत असल्याने परिसरात सध्यातरी पिके जोमदार दिसत आहेत. तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची कोळपणी, कापूस आणि तूर पिकांचे निंदन करणे सुरू आहे. तर मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव हळद, कापूस आणि तूर या पिकांना खत टाकण्यास सुरूवात केली आहे. सध्या बाजारपेठेत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वेळेवर खताचा साठा कृषी विक्रेत्याकडे उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात युरिया खताची टंचाई निर्माण झालेली आहे. 

सध्या १७ जुलैपर्यंत परिसरात संचारबंदी असल्याने १८ जुलैपासून बाजारात शेतकरी बांधवांची खते, कीटकनाशक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. एकंदरीत खरिपाच्या हंगामातील पिकास उपयुक्त असा पाऊस पडत असल्याने सध्यातरी खरीप हंगामातील पिके जोमदार दिसत आहेत.