होमपेज › Marathwada › लातुरात खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण, काँग्रेसचा नगरसेवक अटकेत

लातुरात खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण, काँग्रेसचा नगरसेवक अटकेत

Published On: Dec 28 2018 6:31PM | Last Updated: Dec 28 2018 6:31PM
लातूर : प्रतिनिधी

येथील दोघा परप्रांतीय शिकवणी चालकांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यांच्याकडून २५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन नगरसेवकांसह सात जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक सचिन मस्के यास अटक करण्यात आली असून सोमवारपर्यंत न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य आरोपी फरार असून त्याच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहे. या घटनेने लातूरचे शैक्षणिक क्षेत्र पुन्हा एकदा हादरले असून क्लासवरमधून घडलेल्या अविनाश चव्हाण हत्या प्रकरणाची आठवण यामुळे पुन्हा ताजी झाली आहे.

लातूर येथील उद्योग भवन परिसरात विजयसिंह परिहार व राजीव तिवारी हे रसायनशास्त्राचे शिकवणी वर्ग घेतात. त्यांच्याकडे नगरसेवक सचिन मस्के, पुनित पाटील, विनोद खटके व अन्य चौघे जण २५ लाखाची खंडणी मागत होते. ती न दिल्यास जिवे मारण्याचा तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या ते देत होते. 

लातुरात शिकवणी घ्यायची असेल तर पैसे द्यावेच लागतात असा दम हे ते वारंवार देत असल्याने परिहार व तिवारी कमालीचे घाबरले होते. विशेष म्हणजे भीतीपोटी त्यांनी त्याना ६ लाख ६६९ रुपये दिले होते. तथापि २५ लाखासाठी आरोपीचा तगादा सुरूच होता. मागितलेली रक्कम मिळावी म्हणून एका  प्राध्यापकास १० डिसेंबर रोजी जबरदस्तीने पळवून नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली होती. मारहाणीबाबत पोलिसांना सांगितले तर कुटुंब खलास करू असा दम त्यांनी भरला होता .यामुळे हे प्राध्यापक भीतीच्या सावटाखाली वावरत होते. काय करावे व कुणाला सांगावे ?  हे प्रश्न त्यांच्या चिंतेत भर घालत होते. शेवटी धाडस बांधून त्यांनी शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब घातली. सांगळे यांनी त्यांना धीर देऊन आरोपीविरुद्ध  कारवाई करण्याची हमी दिली होती.