Mon, Dec 16, 2019 11:28होमपेज › Marathwada › प्रकाश आंबेडकरांचा दौरा धाकधूक वाढविणारा

प्रकाश आंबेडकरांचा दौरा धाकधूक वाढविणारा

Published On: Apr 12 2019 2:06AM | Last Updated: Apr 12 2019 1:38AM
उस्मानाबाद : प्रतिनिधी

सुरुवातीला दुरंगी वाटणारी लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघाची लढत आता तिरंगी होऊ लागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला झालेली गर्दी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल कसेल याकडे राजकीय वर्तुळाचे लागले आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आ. राणाजगजितसिंह पाटील, शिवसेनेचे माजी आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर रिंगणात आहेत. सुरुवातीला ही लढत दुरंगी भासत होती. प्रत्यक्षात बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांनीही मतदारसंघात जोर लावल्याने आता लढतीचे रंगही बदलू लागले आहेत. सलगर हे धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्याबरोबरच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी शहरात प्रचारसभा घेतली. या सभेला भरदुपारी झालेली गर्दी पाहता मुस्लिम, दलित मतांवर भिस्त असलेल्या उमेदवाराला डॅमेज कंट्रोल करावे लागणार आहे. 

शहरात मुस्लिम धर्मियांची मोठी संख्या आहे. दलित आणि मुस्लिम ही मते काँग्रेस, राष्ट्रवादीची हक्काची व्होटबँक मानली जात होती. गेल्या काही वर्षांपासून मात्र हीच बँक विभागली गेली आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन गेल्या वेळी बहुतांश धनगर समाजाची साथ भाजपला मिळाली होती. तर मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठिशी राहिला होता. मतमोजणीवेळी हे स्पष्टही झाले होते. या वेळी अ‍ॅड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला आहे. सुरुवातीला या आघाडीला गांभिर्याने घेतले जात नव्हते. मतदान जवळ तसतसे मात्र आघाडीचा धसका प्रस्थापित उमेदवार घेऊ लागले आहे. आघाडी जितकी मते खेचेल तितका त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.