Tue, Dec 10, 2019 07:13होमपेज › Marathwada › परभणीकरांना दोन दिवस निर्जळी

परभणीकरांना दोन दिवस निर्जळी

Published On: Dec 29 2018 1:37AM | Last Updated: Dec 28 2018 10:23PM
परभणी : प्रतिनिधी

राहटी बंधार्‍यातून शहरास पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी शुक्रवारी (दि.28) सकाळी 10 वाजता फुटली. यामुळे दोन दिवस शहरास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्रिधारा परिसरात मुख्य वाहिनी फुटल्याची माहिती मिळताच मनपा प्रशानाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरू केले ते पूर्ण होण्यासाठी दोन दिवस लागणार असल्याने तोपर्यंत शहरास पाणीपुरवठा होणार नाही. 

पूर्णा नदीवरील राहटीच्या बंधार्‍यातून शहराकडे जलवाहीनीव्दारे पाणी येते. शुक्रवारी पाण्याच्या प्रवाहाच्या दबावाने त्रिधारा परिसरात जलवाहीनीस तडा गेल्याने  बराचवेळ विसर्ग झाला. शहरातील 70 टक्के भागास या वाहनीव्दारे पाणीपुरवठा होतो. परंतू तिला तडे जाण्यास सुरुवात झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. ही जलवाहिनी 35 ते 40 वर्षापूर्वीची असून सध्यस्थितीला ती जूनी झाल्याने  पाण्याच्या प्रवाहाचा दाब सहन करू शकत नाही. आगामी काळात लिकेजेसचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुळे निम्नदुधना व येलदरी प्रकल्पातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते.

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यासाठी लागणारे साहित्य नांदेड येथून आणल्या जात आहे.  दुरुस्ती खोदकाम पूर्ण झाले असून वाहिनीच्या दुरुस्तीसाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यास दोन दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. 
- वसिम पठाण, 
शहर अभियंता, मनपा, परभणी