होमपेज › Marathwada › पंकजा मुंडेंच्या मध्य प्रदेशात प्रचारसभा

पंकजा मुंडेंच्या मध्य प्रदेशात प्रचारसभा

Published On: Nov 26 2018 1:23AM | Last Updated: Nov 26 2018 1:23AMबीड : प्रतिनिधी

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या  प्रभावी भाषणाने मध्य प्रदेशातील जनतेचीही मने जिंकली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समवेतच्या महू येथील सभेसह अन्य तीन ठिकाणी झालेल्या त्यांच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. 

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे शनिवारी मुंबईहून इंदौरला रवाना झाल्या. सकाळी विमानतळावर पोहोचताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर उज्जैन येथे दक्षिण विधानसभा मतदारसंघ, महू, इंदौर विधानसभा क्षेत्र क्र. 2, रामनगर आणि विधानसभा क्षेत्र क्र. 3 शिवाजीनगर भागात भाजपा उमेदवारांसाठी त्यांनी सभा घेतल्या. या सर्व ठिकाणी मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. उज्जैन येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर महू येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समवेत त्यांच्या सभा झाल्या.  पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची उत्कृष्ट कामगिरी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या कार्यकाळात मध्यप्रदेशचा झालेला सर्वांगिण विकास यावर जोर दिला. काँग्रेस हा मावळतीला आलेला पक्ष आहे, त्यांच्याकडे भाजपवर टिका करण्याशिवाय दुसरा कोणताही अजेंडा नसल्याचे त्या म्हणाल्या. भाजप सरकारलाच पुन्हा सत्तेवर आणण्याची जबाबदारी तुमची आहे  असे त्या म्हणाल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महू येथील जन्मस्थळाला पंकजा मुंडे यांनी या दौर्‍यात भेट देऊन अभिवादन केल्यानंतर प्रचाराला सुरुवात केली. या ठिकाणच्या स्मारकाची त्यांनी पाहणी केली. स्मारक समितीच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या ठिकाणी आलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या भेटीही पंकजा मुंडे यांनी घेतल्या.

मराठवाड्यातील जनतेशी साधला संवाद

इंदौर विधानसभा क्षेत्र क्र. 2 व 3 मध्ये  मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, नगर,जामखेड आदी भागांतील मतदार मोठ्या संख्येने आहेत, लोकनेते गोपीनाथराव मुंडेदेखील नेहमी या ठिकाणी सभा घ्यायचे आता तीच परंपरा पंकजा मुंडे यांनी चालवून जनतेशी संवाद साधला. भाषणाच्या वेळी या भागातील लहान मुले तसेच तरुणांनी ‘मुंडे साहेब अमर रहे’ चे फलक झळकावून आपल्या नेत्याप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. येथील जनतेने दिलेल्या प्रतिसादाने पंकजा मुंडेही भारावून गेल्या.