Wed, Jul 08, 2020 09:28होमपेज › Marathwada › शेतकऱ्यांना देशोधडीला लावून हल्लाबोल कसला ? : पंकजा मुंडे

शेतकऱ्यांना देशोधडीला लावून हल्लाबोल कसला ? : पंकजा मुंडे

Published On: Jan 26 2018 3:40PM | Last Updated: Jan 26 2018 3:40PMपरळी : प्रतिनिधी

ज्यांनी शेतक-यांना देशोधडीला लावले ते आज शेतकऱ्यांविषयी खोटा कळवळा आणत आहेत. आता हल्लाबोल कसला करता? असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. त्या ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याचा प्रारंभ तपोवन येथून करताना बोलत होत्या. या दौ-यात त्यांच्या हस्ते ग्रामीण भागातील विविध ठिकाणी मूलभूत विकास योजनेच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.  

पंकजा मुंडे यांनी तपोवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा खरपूस समाचार घेतला. सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्षात मिळाल्याचे ठिक ठिकाणच्या शेतकऱ्यांनीच दौऱ्यात सांगितले त्यामुळे हल्लाबोल यात्रा किती फसवी आहे, हे दिसून आले. हे स्पष्टपणे सांगताना त्यांनी समोर बसलेल्या शेतक-यांना आलेले कर्जमाफीचे एसएमएस लोकांना दाखवले. परळी मतदारसंघात ८५ कोटी कर्जमाफी झाली असून एकट्या सिरसाळा सर्कलमध्ये साडे चार हजार शेतक-यांना २१ कोटी माफी केली आहे. आम्ही त्यांच्यासारख्या थापा मारल्या नसून प्रत्यक्ष काम करून दाखवले असल्याचे त्या म्हणाल्या. 

विकासाच्या योजना गोरगरिबां पर्यंत पोहोचविण्यासाठीच गांव तिथे विकास दौरा काढण्यात येत आहे. रस्ते, पाणी, मुलभूत सोयींसह प्रत्येक गावांत हायमास्ट दिवे, शुध्द पाण्यासाठी आरओ सिस्टीमसह शासनाच्या विविध योजनेतून किमान एक कोटीची कामे मंजूर करण्यात आली असून सर्व गावे स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण कटीबध्द राहू अशी ग्वाही जिल्हयाच्या पालकमंत्री  पंकजा मुंडे यांनी येथे दिली.

या दौ-यात भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, ज्येष्ठ नेते नामदेवराव आघाव, श्रीहरी मुंडे यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.