Tue, Jul 07, 2020 18:03



होमपेज › Marathwada › उस्मानाबाद, जालना पहिल्या पाचमध्ये

उस्मानाबाद, जालना पहिल्या पाचमध्ये

Last Updated: Feb 13 2020 12:21AM




पुणे : पुढारी वृत्तसेवा
डिजिटल स्वाक्षरी सात-बारा डाउनलोड करण्यामध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून, आतापर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी विविध कामांसाठी 56 हजार 984 सात-बारा डाउनलोड केले आहेत. राज्यात मंगळवारपर्यंत 6 लाख 75 हजारहून अधिक डिजिटल स्वाक्षरी सात-बारा डाउनलोड झाले आहेत. पुणे जिल्ह्यानंतर अकोला, यवतमाळ, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांचा क्रम लागतो.

राज्यात सुमारे दोन कोटी 52 लाख सात-बारा असून, त्यापैकी 2 कोटी  40 लाख सात-बारा  डिजिटल स्वाक्षरी झाले आहेत. उर्वरित सात-बारा पुढील काही महिन्यांत डिजिटल स्वाक्षरी होणार आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या वतीने 20 सप्टेंबरपासून डिजिटल स्वाक्षरी झालेले सात-बारा डाउनलोड करण्यासाठी नागरिकांना खुले केले आहेत. स्वाक्षरी असलेले डिजिटल सात-बारा विविध शासकीय कामांसाठी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे तलाठ्याकडे जाण्याची गरज उरली नाही. ऑनलाइन सात-बारासाठी नागरिकांना एका डिजिटल स्वाक्षरी सात-बारासाठी केवळ पंधरा ते वीस रुपये मोजावे लागतात. अत्यंत कमी वेळेत डिजिटल स्वाक्षरी सात-बारा उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचत आहे.

राज्यात सप्टेंबर महिन्यापासून डिजिटल सात-बारा ऑनलाइन देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी घेतला आहे.
 राज्यात सर्वात अधिक म्हणजेच 56 हजार 894  डिजिटल स्वाक्षरी सात-बारा पुणे जिल्ह्यात डाउनलोड झाले आहेत. त्या खालोखाल अकोला 55 हजार 969, यवतमाळ 54 हजार 587 आणि उस्मानाबाद 50 हजार 958 अनुक्रमे दोन, तीन आणि चार या क्रमांकावर डिजिटल स्वाक्षरी सात-बारा उतारे डाउनलोड झाले आहेत.