होमपेज › Marathwada › काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांच्या अर्जावर आक्षेप

काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांच्या अर्जावर आक्षेप

Published On: Mar 27 2019 9:05PM | Last Updated: Mar 27 2019 9:05PM
नांदेड : प्रतिनिधी 

नांदेड लोकसभा मतदारसंघात विहित मुदतीत दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया बुधवारी सकाळी सुरू झाल्यानंतर, काँग्रेस उमेदवार खा.अशोक चव्हाण यांच्या अर्जावर दोन अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतले. यामुळे  शहर व जिल्ह्यात खळबळ उडाली.

नांदेड मतदारसंघात 59 उमेदवारांचे 94 अर्ज दाखल झाले असून अर्ज भरणार्‍यांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह काही नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार तसेच अपक्षांचाही समावेश आहे. यातील रवींद्र गणपतराव थोरात आणि शेख अफजलोद्दीन ऊर्फ शेख सर यांनी खा.चव्हाण यांच्या अर्जासोबतच्या शपथपत्रातील काही माहितीवर लेखी आक्षेप नोंदविला. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी ते दाखल करून घेत दुपारी 4 वाजता सुनावणी ठेवली.

हे दोन आक्षेप वगळता इतर कोणत्याही अर्जांवर आक्षेप आले नाहीत. इतर अर्जांवरील छाननी प्रक्रिया दुपारी पूर्ण झाली, पण खा.चव्हाण यांच्या अर्जावरील आक्षेपावरचा निर्णय लांबणीवर पडल्यामुळे छाननी प्रक्रियेत नेमके किती अर्ज वैध ठरले, याची माहिती प्रशासनाने रात्री साडे नऊपर्यंत राखून ठेवली.

खा.चव्हाण यांच्या अर्जावर आक्षेप दाखल झाल्यानंतर त्यांचे सनदी लेखापाल तसेच वकील अ‍ॅड.पुरूषोत्तम भक्कड प्रभूतींनी त्यावर बाजू मांडण्याची तयारी सुरू केली. सायं.4 वाजता जिल्हा निवडणूक अधिकारी अरूण डोंगरे यांच्यासमोरच्या सुनावणीत उभय बाजूंच्या वकिलांनी युक्‍तिवाद केल्यानंतर काही वेळेत निर्णय दिला जाईल, असे अपेक्षित होते, पण जिल्हाधिकार्‍यांनी आपला निर्णय राखून ठेवला व रात्री 9.30 वाजता निकाल दिला जाईल, असे जाहीर केले.

चव्हाण यांनी यापूर्वी लोकसभेच्या तीन तसेच विधानसभेच्याही 3 निवडणुका लढविल्या आहेत, पण प्रतिस्पर्ध्यांतील कोणीही त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला नाही. आता त्यांची लढत भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरूद्ध होत असून त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर भाजपतील श्यामसुंदर शिंदे, ओमप्रकाश पोकर्णा, दिलीप ठाकूर ही मंडळी सक्रिय झाल्याचे दिसून आले. हे सर्वजण सुनावणीच्यावेळी उपस्थित होते, त्यामुळे चव्हाण यांना अडचणीत आणण्याच्या मोहिमेत भाजप असल्याचे बोलले जात आहे.

नेमका आक्षेप काय?

खा.अशोक चव्हाण यांच्या नावावर भारत पेट्रोलियम कंपनीच्या एलपीजी गॅसची एजन्सी आहे. या कंपनीत भारत सरकारचा 51 टक्के हिस्सा असून गॅसजोडणी व सिलिंडर विक्रीतून चव्हाण यांना आर्थिक मिळकत आहे. त्यांनी भारत सरकारच्या अखत्यारीखालील लाभाचे पद धारण केल्याचा मुद्दा मांडून थोरात यांनी आक्षेप नोंदविला.