Thu, Jul 09, 2020 23:43होमपेज › Marathwada › पाटोद्यात केवळ तीस टक्केच पेरण्या झाल्या पूर्ण 

पाटोद्यात केवळ तीस टक्केच पेरण्या झाल्या पूर्ण 

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 29 2018 11:39PMपाटोदा : महेश बेदरे  

पाटोदा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात अद्याप 30 टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या असून अजूनही 60 ते 65 टक्के पेरण्या बाकी आहेत. सध्या पावसाच्या लपंडावामुळे  बळीराजा धास्तावला असून त्यामुळेच पेरण्याला विलंब होत असल्याचे चित्र आहे, तर यंदा शेतकर्‍यांनी कपाशीकडे सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र असून सोयाबीन, तूर, उडीद याकडे शेतकर्‍यांचा कल आहे, सोयाबीन बियाणे तुटवड्यामुळे काळ्या बाजारात अत्यंत चढ्या भावाने विकले जात असल्याची ग्रामीण भागातील अनेक शेतकर्‍यांची तक्रार आहे तर अंमळनेर महसूल मंडळात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीच्या घाई करू नये, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे .

पाटोदा तालुक्यात खरिपाचे एकू ण क्षेत्र 44 हजार 850 हे. एवढे असून या पैकी अद्यापपर्यंत 30 ते 35 टक्के पेरण्याच झाल्या आहेत. यंदा  तालुक्यात एकूण सरासरी 123 मिमी पाऊस झाला असून पेरणीसाठी 100 मिमी पावसाचीच आवश्यकता असते. या वर्षी ज्या पेरण्या झाल्या आहेत त्यापैकी बहुतांश शेतकर्‍यांचा कल सोयाबीनकडे असून कपाशीकडे मात्र यंदा अनेकांनी  पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यंदा तालुक्यातील चार महसूल मंडळांपैकी अंमळनेर मंडळात सर्वांत कमी म्हणजेच केवळ 23 मिमी पाऊस झाल्याने या भागातील शेतकर्‍यांनी सध्या पेरण्या करू नयेत असे कृषी विभागाने सांगितले आहे .पाटोदा तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 77008 एवढे असून त्यापैकी पेरणीयोग्य क्षेत्र 63 हजार 313 इतके आहे, हे क्षेत्र सरासरीच्या 82 टक्के इतके आहे.