Fri, Jul 10, 2020 02:56होमपेज › Marathwada › परभणी जिल्ह्यात कांदा उत्पादकांची शून्य नोंद

परभणी जिल्ह्यात कांदा उत्पादकांची शून्य नोंद

Published On: Feb 18 2019 1:14AM | Last Updated: Feb 18 2019 1:00AM
परभणी: प्रतिनिधी

कृषी उत्पन्न व खाजगी बाजार समितीअंतर्गत नोंद करण्यात आलेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने नुकताच घेतला आहे, पण याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात माहिती विचारली असता जिल्हाभरातील 11 पैकी एकाही बाजार समितीत कांदा उत्पादकांची नोंद नसल्याची माहिती मिळाली. 

राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने दि. 1 नोव्हेंबर ते दि. 15 डिसेंबर 2018 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल 200 रुपये व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. हा निर्णय नुकताच घेण्यात आला असून त्याअनुषंगाने अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहे. सदरील योजनेंतर्गत प्राप्त होणार्‍या प्रस्तावांची छाननी करून जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित केले जाणार आहे, पण परभणी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 11 बाजार समित्यांमध्ये या कालावधीत एकाही कांदा उत्पादक शेतकर्‍याने कांदा विक्रीसाठी न आणल्याने त्यांची नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी एस.यू.काळे यांनी दिली. यामुळे शासनाचा कल्याणकारी अनुदान निर्णय असला तरी परभणी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना याचा कोणताही फायदा होणार नसल्याचे दिसते. जिल्हयात असंख्य कांदा उत्पादक शेतकरी असून ते ज्या ठिकाणी कांद्याची विक्री करतात तेथे जाऊन नोंदी घेणे आवश्यक आहे. पण तसे होत नसल्यानेच या नोंदी शून्य असल्याचे बोलल्या जात आहे.