Fri, Apr 23, 2021 14:07
अनसिंग येथील प्रकरण : ९ जणांना तीन महिन्याचा कारावास, एकास जन्मठेप

Last Updated: Apr 07 2021 5:55PM

वाशिम : पुढारी वृत्तसोवा

वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम बघण्यासाठी गेले असता तेथे अनसिंग येथील सागर सुरेश गव्हाणे याने राहूल केशव काळे याच्याकडे रागाने बघीतले. यावेळी राहूल काळे याने माझ्याकडे रागाने का पाहतोस असे विचारल्यावरुन भांडण झाले होते. या भांडणात सागर सुरेश गव्हाणे याने केलेल्या जबर मारहाणीत राहुलचा भाऊ संजय काळे याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने आज (दि. ७) निकाल सुनावला. यावेळी न्यायालयाने याप्रकरणामध्ये एका जणास जन्मठेप तर इतर ९ जणांना प्रत्येकी तीन महिणे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर फितूर साक्षीदारावर आणि तपास अधिकार्‍यावर देखील कारवाईचे निर्देश दिले आहेत.

घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार, अनसिंग येथे राहूल केशव काळे व त्यांचा भाऊ संजय केशव काळे हे अनसिंग येथील प.दि. जैन महाविद्यालयात मुलाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम बघण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे अनसिंग येथील सागर सुरेश गव्हाणे याने राहूल केशव काळे याच्याकडे रागाने बघीतले. यावेळी राहूल काळे याने रागाने का बघतोस असे म्हणताच सागरने राहूल व संजय काळे यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी गजानन विष्णू गवळी व इतर उपस्थितांनी मध्यस्थी करुन हे भांडण सोडविले. यानंतर राहूल काळे व संजय काळे हे सागर गव्हाणे याच्या दुकानसमोरून जात होते. त्यावेळी श्याम गव्हाणे आणि त्याचे इतर साथीदारांनी राहूल काळे व संजय काळे यांना मारहाण केली. यावेळी सागर गव्हाणे याने पळत येवून चहाच्या टपरीमधील लोखंडी रॉडने राहूलला जखमी केले. तेंव्हा हे दोघे भाऊ अनसिंग पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी जात असताना सागर गव्हाणे याने मागून संजय केशव काळे याच्या डोक्यात दगड मारला. यावेळी तेथे असणाऱ्या इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संजय काळे याला उपस्थितांनी अनसिंग येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला वााशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याला उपचारादर्मायान डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणावर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायमुर्ती डॉ. रचना आर. तेहरा यांनी निकाल दिला आहे. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अभिजीत व्यवहारे यांनी काम पाहिले तर त्यांना अ‍ॅड. व्ही. पी. वाबळे यांनी सहकार्य केले.

पोलीस तपासावर ताशेरे

न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना सरकार पक्षाने तपासातील अनेक त्रुट्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने तपास अधिकार्‍यावर गंभीर ताशेरे ओढले. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांना उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणाचा तपास एपीआय ज्योती विल्लेकर यांनी केला होता.