Tue, Jul 14, 2020 09:16होमपेज › Marathwada › परभणी : ओव्हरटेक करताना नवदाम्पत्य ठार

परभणी : ओव्हरटेक करताना नवदाम्पत्य ठार

Published On: Jul 26 2019 7:10PM | Last Updated: Jul 26 2019 6:45PM
मानवत : प्रतिनिधी

पाथरी येथून मानवतकडे येत असताना जीपला ओव्हरटेक करत असताना झालेल्या भीषण अपघातात पाथरी तालुक्यातील पोहेटाकळीचे नव दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.२६) दुपारी १च्या सुमारास रत्नापुर येथे राष्ट्रीय महामार्गावर घडली. भागवत बापूराव गोंगे (वय२४) व पत्नी आरती भागवत गोंगे (वय २१) अशी मृतांची नावे आहेत. 

या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून कळालेली माहिती अशी की, पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील भागवत गोंगे व त्यांची पत्नी आरती या मोटरसायकल (एमएच-२२-वाय-७४०१) वरून मानवत येथे जात होते. रत्नापुरजवळ येताच पाथरीवरून मानवतकडे येणाऱ्या एका जीपला त्यांनी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र मानवतहून पाथरीकडे जाणाऱ्या ट्रकवर (एमएच-०४-बी-९३७४) मोटरसायकल आदळली. त्यामुळे मोटरसायकलवरील भागवत व त्यांच्या पत्नी रस्त्यावर फेकले गेले.

यावेळी आरती यांच्यावरून मागून येणारी जीप गेल्याने डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी भागवत गोंगे यांना उपचारासाठी परभणीला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी पोलिसांनी वाहने ताब्यात घेऊन वाहनचालकावर गुन्हा दाखल केला.